वेरूळच्या व्हॉल्वो बसचे दोन दर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - वेरूळ पर्यटन व्हॉल्वो बसच्या तिकिटात तफावत येत असल्याने प्रवासी आचंबित झाले आहेत. सहा दिवस एकच तिकीट दिले जात असताना, सातव्या दिवसी दिले जाणारे तिकीट हे २५ रुपयांनी कमी होते; मात्र हे डिस्काउंट नसून, तिकीट दराचा घोळ आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हा प्रकार सुरू असतानाही अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाने एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान होत आहे. 

जगप्रसिद्ध वेरुळ आणि अजिंठा या लेणीसाठी पर्यटन विकास महामंडळ आणि एसटी महामंडळाच्या वतीने शिवनेरी व्हॉल्वो बस सुरू करण्यात आलेल्या आहेत. पर्यटनाचा वारसा असलेल्या वेरुळला जाण्यासाठी विदेशी पर्यटकांसह देशभरातील पर्यटक व प्रवासी भेट देत असतात, या पर्यटकांना वेरूळ आणि अजिंठ या दोन्ही बसची पर्वणीच आहे; मात्र औरंगाबाद-वेरूळ या पर्यटन बसचे २७६ रुपये प्रवास भाडे ठरविण्यात आलेले आहे. या बससाठी रोज एकच वाहक असतो. रोजच्या वाहकाच्या तिकीट मशीनमधून २७६ रुपयांप्रमाणे बरोबर भाडे आकारले जाते. नियमित वाहकाची सोमवारी सुटी असते. त्यामुळे सोमवारी येणाऱ्या बदली वाहकाच्या तिकीट मशीनमधून २५१ रुपयांचे भाडे आकारणी होते. बस एकच असली तरीही भाडे मात्र दोन प्रकारात फाडले जाते. गेल्या आठ महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. तिकीट मशीनमधून प्रत्येक सोमवारी आणि नियमित वाहकाने सुटी घेतलेल्या दिवशी कमी तिकीट आकारणी होत असल्याने प्रतिप्रवासी पंचवीस रुपयांचा फटका बसत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने वाहकांनी व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ही बाब सांगून तिकीट टप्प्यांमध्ये काय चूक आहे ती दुरुस्त करण्याची विनंती केली; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष चालविले आहे. हा सगळा प्रकार प्रवाशांना गोंधळात टाकणारा असून, खरे तिकीट कोणते आहे, असा प्रश्‍न प्रवासी विचारत आहेत. एखाद्या वाहकाकडून तिकीट देण्यात चूक झाली किंवा त्याच्या हिशेबात पैशांचाही घोळ झाला तर त्याला निलंबित केले जाते. मग अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाने सुरू असलेल्या या घोळाची जबाबदारी कोणाची आहे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.