समस्या सोडविण्यासाठी उभारणार वॉररूम - महापौर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नागरिकांच्या नागरी समस्यांची दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी वॉररूम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. 

औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नागरिकांच्या नागरी समस्यांची दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी वॉररूम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. 

सर्वसामान्य माणसाला महापालिकेशी संबंधित काम करून घ्यायचे म्हणले; तर जीव मेटाकुटीला येतो. जनतेची कामे करण्यास अधिकाऱ्यांकडून नेहमीच टाळाटाळ केली जाते. नागरिकांनी तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत आणि कामही होत नाही. त्यामुळे नागरिकांची महापालिका प्रशासनावर नाराजी वाढत आहे. त्यामुळेच महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याबाबत महापौर घोडेले यांनी सांगितले, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जावी.

जनतेच्या अडचणींची सोडवणूक व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात वॉररूम सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वॉररूममध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंद घेतली जाणार आहे. प्राप्त होणारी तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल. त्या विभागाकडे पाठपुरावा करून तक्रारींचे निराकरण केल्यानंतर तक्रारदारांना या वॉररूममधूनच कळविले जाणार आहे. सात दिवसांत तक्रारींची सोडवणूक केली जाईल आणि तक्रारींचा रोज अहवाल महापौर कार्यालयात मागविला जाणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय राखला जाईल.  

कचरा उचलण्यासाठी विशेष मोहीम
शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी साफसफाईवर लक्ष केंद्रित केले असून, शहरातील दुर्लक्षित भागातील कचरा उचलण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाला कामाला लावले आहे. रविवारी (ता. पाच) रंगार गल्ली, समर्थनगर, शहागंज, टीव्ही सेंटर या भागात साचलेला कचरा उचलण्यात आला.