रुग्णसेवेतून सापडेल जगण्याचा मार्ग - डॉ. मायकेल रिअरडन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

औरंगाबाद - ‘‘रुग्णांच्या सेवेतही सुख असते. ते अनुभवा. त्यातूनच जगण्याचा खरा मार्ग सापडेल,’’ असा सल्ला प्रा. डॉ. मायकेल रिअरडन यांनी मंगळवारी (ता. २५) विद्यार्थ्यांना दिला. महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम) इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस अभिमत विद्यापीठाच्या सातव्या पदवीदान समारंभप्रसंगी रुक्‍मिणी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. मायकेल म्हणाले, ‘‘ प्रत्येकाचा आदर्श वेगवेगळा असू शकेलही, मात्र स्वतःचा मार्ग तयार करायला शिका. त्यासाठी स्वतःच्या कार्यावर प्रेम करण्याची गरज आहे. रुग्णांच्या आयुष्याचे सोने करण्याची ताकद डॉक्‍टरांमध्ये असते.

औरंगाबाद - ‘‘रुग्णांच्या सेवेतही सुख असते. ते अनुभवा. त्यातूनच जगण्याचा खरा मार्ग सापडेल,’’ असा सल्ला प्रा. डॉ. मायकेल रिअरडन यांनी मंगळवारी (ता. २५) विद्यार्थ्यांना दिला. महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम) इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस अभिमत विद्यापीठाच्या सातव्या पदवीदान समारंभप्रसंगी रुक्‍मिणी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. मायकेल म्हणाले, ‘‘ प्रत्येकाचा आदर्श वेगवेगळा असू शकेलही, मात्र स्वतःचा मार्ग तयार करायला शिका. त्यासाठी स्वतःच्या कार्यावर प्रेम करण्याची गरज आहे. रुग्णांच्या आयुष्याचे सोने करण्याची ताकद डॉक्‍टरांमध्ये असते. याची जाणीव डॉक्‍टर या नात्याने वेळीच झाली पाहिजे.’’ 

कार्यक्रमादरम्यान विद्यापीठाची डॉक्‍टर ऑफ सायन्सेस अर्थात डी. एस. सी. ही सर्वोच्च पदवी डॉ. मायकेल रिअरडन यांना कुलपती डॉ. नारायणखेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या वेळी व्यासपीठावर एमजीएमचे संस्थापक अध्यक्ष कमलकिशोर कदम, कुलपती डॉ. के. जी. नारायणखेडकर, कुलगुरू डॉ. सुधीरचंद्र कदम, डॉ. एस. के. कौल, डॉ. चंदेर पुरी, परीक्षा नियंत्रक डॉ. एन. एन. कदम, डॉ. एन. सी. मोहंती, डॉ. ए. जी. श्रॉफ, डॉ. जी. एस. नारशेट्टी, कुलसचिव डॉ. राजेश गोयल, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, विश्‍वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे, डॉ. राजेंद्र बोहरा, डॉ. के. आर. सलगोत्रा, अशोक पाटील, डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. डॉ. सारिका गाडेकर, डॉ. अभय जैन यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

५३७ विद्यार्थ्यांना दिली पदवी 
कार्यक्रमात एम. बी. बी. एस., एम. डी., एम. एस., नर्सिंग, पीएचडी., फिजिओथेरपी आदींसह आरोग्य शास्त्राशी संलग्न इतर अभ्यासक्रमाच्या एकूण ५३७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. 

अर्धा डझन सुवर्णपदके पटकाविणारा ‘भूषण’वीर 
वैद्यकीय शास्त्राच्या विविध विषयांमधील उल्लेखनीय कामगिरीसाठी १० सुवर्णपदके दिली गेली. यापैकी चक्क सहा सुवर्णपदके भूषण वाड या विद्यार्थ्याने पटकाविली. अनिकेत शेनॉय, पूजा अय्यंगर, जनपित सिंग, सबिहा बेगम यांना प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळाले.

दहा वर्षांच्या काळामध्ये विद्यापीठाने संशोधनासंदर्भात आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत सामंजस्य करार केले आहेत. यात पेन्सिलव्हानिया विद्यापीठ, सिडनी विद्यापीठ, क्वीन्स विद्यापीठ कॅनडा, किंगपुक नॅशनल विद्यापीठ कोरिया, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ बायोमॅकॅनिक्‍स बायो इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्‍नॉलॉजी आय.आय.टी मुंबई, एस.एन.डी.टी.वूमेंन्स विद्यापीठ, मुंबई आदींचा समावेश आहे. 
- डॉ. सुधीरचंद्र कदम, कुलगुरू 

सेवा करताना स्वतःला भौगोलिक क्षेत्राची मर्यादा घालून घेऊ नका, तर जगात जिथे तुमची गरज असेल तिथे जा. रुग्णांचे आसू पुसणे हेच संस्थेचे ध्येय आहे. त्यासाठी दुर्गम भागातील ५० हजारांपेक्षा जास्त रुग्णांना सेवा देण्याचे कार्य सुरू आहे. संस्थेची सुरवात नांदेड येथून डॉ. नितीन पाटील यांनी सुरू  केलेल्या छोटेखानी दवाखान्याचा आजघडीला १० मोठ्या दवाखान्यांत झाल्याचे ते म्हणाले.
- कमलकिशोर कदम, संस्थापक अध्यक्ष 

प्रत्येकासाठी स्पर्धा अटळ आहे; परंतु ती स्वतःशी की दुसऱ्याशी हे स्वतःने ठरवायचे आहे. तसेच वैद्यकीय शास्त्रामध्ये संशोधन होणे काळाची गरज असली तरी संशोधन रुग्ण सेवेशी संबंधित असले पाहिजे. प्रत्येकात असामान्य गोष्ट असते; परंतु सामान्य म्हणून जगायचे की असामान्य हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
- डॉ. नारायण खेडकर, कुलपती