नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक

अनिल जमधडे
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

विमानतळ प्राधिकरणातील भरतीच्या खोट्या जाहिराती

विमानतळ प्राधिकरणातील भरतीच्या खोट्या जाहिराती
औरंगाबाद - औरंगाबाद अंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध पदांसाठी भरती असल्याच्या जाहिराती छापून तरुणांची दिशाभूल केली जात असल्याचा प्रकार सुरू झाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांतील तरुण ई-मेलवर आलेले पत्र घेऊन विमानतळ प्राधिकरणाकडे येत असून, अशी कुठल्याही प्रकारची भरती नसल्याचे समजल्यावर तरुणांना फसविले गेल्याचे निदर्शनास येत आहे.

औरंगाबाद शहरातील विमानतळावर विविध पदांची भरती करण्यात येणार असल्याच्या जाहिराती विविध जिल्ह्यांतील वर्तमानपत्रांमध्ये येत आहेत. या जाहिरातींच्या अनुषंगाने रोज किमान चार ते पाच जण विमानळावर चौकशी करण्यासाठी येत आहेत. काहींनी ई-मेलवर आलेले पत्रही केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. या ठिकाणी चौकशीसाठी आलेल्या तरुणांना अशी कुठलीही भरती नसल्याचे सांगितले गेले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले. बुधवारी (ता. सहा) दुपारपर्यंत पाच तरुण अशापद्धतीने येऊन गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून अशापद्धतीने तरुण विमानतळावर चौकशीसाठी येत आहेत. जाहिरातीत दिलेल्या बॅंक खाते क्रमांकावर काही तरुणांनी पैसे भरल्याचे सूत्रांनी सांगितले. विमानतळाची भरती अशापद्धतीने होत नाही. त्यामुळे कुणीही जाहिरातीवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन विमानतळ प्राधिकरणाने केले आहे.

Web Title: aurangabad marathwada news youth cheating for recruitment