‘सकाळ’च्या वर्धापनदिनी फुल टू धमाल! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

औरंगाबाद - ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी (ता. एक) नृत्य, संगीत आणि विनोदाची बहारदार मैफल रंगणार आहे. लोकप्रिय अभिनेते, विनोदी कलाकारांच्या मनोरंजक कार्यक्रमाला वाचक, वितरक, जाहिरातदार आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आग्रहाचे आमंत्रण देण्यात येत आहे.

सिडकोतील जगत्‌गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात सायंकाळी सहापासून चहापान समारंभाला सुरवात होईल. सोबतच रसिक प्रेक्षकांना खळाळून हसविणारे अभिनेते योगेश सिरसाट आणि सुहास परांजपे, ‘सारेगमप’ व ‘इंडियन आयडॉल’फेम प्रसेनजित कोसंबी, योगिता गोडबोले, ‘एकापेक्षा एक’फेम सुकन्या काळण आणि निवेदिका समीरा गुजर यांचे सादरीकरण होणार आहे. धम्माल मराठी गाणी, नृत्याचा बहारदार कलाविष्कार पाहण्यासाठी वेळेपूर्वीच येऊन आपले आसन आरक्षित करावे.

सन्मान कर्तृत्वाचा
आपल्या कर्तृत्वाचा समाजात ठसा उमटविणाऱ्यांचा गौरव यानिमित्त केला जाणार आहे. मराठवाड्यातील पहिला एव्हरेस्टवीर शेख रफिक, गिर्यारोहक मनीषा वाघमारे, आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवे यांचा गौरव केला जाईल. मुलीच्या लग्नात अनावश्‍यक खर्च टाळून गरिबांना हक्काचे घर देणारे व्यापारी अजय मुनोत आणि मधमाशी संगोपनाबद्दल व्यापक जागृती करणारे डॉ. भालचंद्र वायकर यांचाही सन्मान होईल. 

बोधिवृक्ष रोपांचे वाटप 
राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण व संवर्धन महाकृती अभियानातर्फे ‘सकाळ’च्या वर्धापनदिनानिमित्त ‘बोधिवृक्ष माझ्या दारी’ या उपक्रमाचा भाग म्हणून पिंपळाच्या रोपांचे वाटप होणार आहे. नागरिकांनी अधिकाधिक रोपे घेऊन आपल्या परिसरात लावावीत, असे आवाहन गौतम बुद्ध मेडिटेशन फाउंडेशनतर्फे बोधिमित्र राजेश भोसले पाटील यांनी केले आहे.