औरंगाबादमध्ये अकरावीचे प्रवेश यंदा प्रथमच ऑनलाइन

सुषेन जाधव
मंगळवार, 6 जून 2017

महानगरपालिका हद्दीतील महाविद्यालयांत आजपासून अकरावीचे प्रवेश सुरू होणार असून यंदा हे प्रवेश प्रथमच ऑनलाइन होणार आहेत. मुंबई, पुण्यानंतर औरंगाबादमध्ये हा प्रयोग राबविण्यात येत आहे. विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शन करता यावे यासाठी प्रवेश प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील समस्यांबाबत माहिती देण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे सोमवारी मुख्याध्यापक, प्राचार्यांची कार्यशाळा घेण्यात आली.

औरंगाबाद - महानगरपालिका हद्दीतील महाविद्यालयांत आजपासून अकरावीचे प्रवेश सुरू होणार असून यंदा हे प्रवेश प्रथमच ऑनलाइन होणार आहेत. मुंबई, पुण्यानंतर औरंगाबादमध्ये हा प्रयोग राबविण्यात येत आहे. विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शन करता यावे यासाठी प्रवेश प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील समस्यांबाबत माहिती देण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे सोमवारी मुख्याध्यापक, प्राचार्यांची कार्यशाळा घेण्यात आली.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे हे पहिले वर्ष असल्याने विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या शाळांत नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचे कार्यशाळेत सांगण्यात आले. दरम्यान प्रवेश संदर्भात सूचनाही देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी http://Aurangabad.11thadmission.net या संकेतस्थळावर लॉगीन करावे लागणार आहे. कार्यशाळेला शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे भास्कर बाबर, शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी (निरंतर) लता सानप, डॉ. आर. बी. गरुड, प्रा. राजेंद्र पगारे यांची उपस्थिती होती.

अर्ज कसा करावा
अर्ज करण्यासाठी माहिती पुस्तिकेसह शाळेतच सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती पुस्तिका आणि नमुना अर्जासाठी विद्यार्थ्यांना दीडशे रुपये मोजावे लागणार असून, अधिकचे पैसे घेऊ नये. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शाळांनी मदत करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेशासाठी शहरात पाच झोन करण्यात आले असून, प्रत्येक झोनमध्ये नेमण्यात आलेले महाविद्यालय समन्वयक हे मदत करतील. प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. अर्ज भरल्यानंतर गुणांवर आधारित महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. माहिती पुस्तिकेत विद्यार्थ्यासाठीचा लॉगीन आय. डी. आणि पासवर्ड असणार आहे. तो लॉगीन करून प्रवेश प्रक्रिया करता येणार आहे.

गैरप्रकारास बसेल आळा
अकरावी प्रवेशासाठी किती दिवस अर्ज करता येणार आहे, किती फेऱ्या होतील आदी माहिती दहावीचा निकाल लागल्यानंतर जाहीर होणार आहे. शहरात 104 कनिष्ठ महाविद्यालये असून, ठराविक महाविद्यालयातच प्रवेशासाठी होणारी गर्दी यातून होणारे गैरप्रकार ऑनलाइन प्रक्रियेमुळे रोखता येतील असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

ऑनलाईनचे म्हणजे ताप तर नाही ना?
दहावीत ऐटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात संभ्रम असून, ऐनवेळी विद्यार्थ्यांना विषय बदलता येईल का? याविषयी उपस्थित मुख्याध्यापक, प्राचार्यात ऑनलाइन म्हणजे डोक्‍याला ताप तर होणार नाही ना? अशी चर्चा होती. ऑनलाइन प्रवेश केवळ मराठी, इंग्रजी विषयासाठीच दिला असून उर्दू हिंदीसाठी ऑप्शन नाही. मग आम्ही काय करायचे या सारख्या प्रश्‍नांनी कार्यशाळेत गोंधळ निर्माण झाला होता.

हे असतील पाच झोन
मौलाना आझाद कॉलेज, देवगिरी महाविद्यालय, वसंतराव नाईक विद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, शिवछत्रपती विद्यालय.

शाखानिहाय प्रवेशक्षमता (अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित)
कला शाखा : 7 हजार 440
विज्ञान 10 हजार 120
वाणिज्य शाखा : 3 हजार 480
एमसीव्हीसी : 1 हजार 920
एकूण प्रवेश - 22 हजार 940.