महापालिका रुग्णालयांत बसविणार बायोमेट्रिक  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

बायोमेट्रिक यंत्रामुळे कर्मचाऱ्यांची हजेरी, येणे-जाणे सुलभतेने कळू शकेल. वेळेवर उपस्थित राहिल्याने काम जास्त होईल. प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात येणाऱ्या दहा बायोमेट्रिकच्या ठिकाणी उद्‌भवणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून महापालिकेच्या इतरही आरोग्य केंद्रांत ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. 
- डॉ. जयश्री कुलकर्णी, आरोग्य अधिकारी, महापालिका

औरंगाबाद - कर्मचाऱ्यांच्या लेटलतिफ कारभारावर उपाय म्हणून महापालिकेच्या रुग्णालयांत बायोमेट्रिक उपस्थितीची यंत्रणा लावण्यात येणार आहे. यासंबंधी राज्य शासनाने २३ मार्च २०१६ रोजी निर्देश दिले होते. त्याची १५ ऑगस्टपूर्वी अंमलबजावणी होणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेची दहा रुग्णालये व आरोग्य केंद्रात बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यात येणार आहे. 

महापालिकेची काही रुग्णालये व आरोग्य केंद्रे वगळता इतर ठिकाणी अधिकारी-कर्मचारी उशिरा येण्याच्या तक्रारींची संख्या मोठी आहे. बायोमेट्रिक उपस्थितीची यंत्रणा बसविल्यामुळे लेटलतिफावर वचक बसणार आहे. या यंत्रातील माहितीच्या आधारे व आधार कार्ड क्रमांक जोडून पगार करणे शासन नियमामुळे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे सेटिंग करून सुट्यांचा ऑनड्यूटी आनंद घेणाऱ्यांनाही पगारासाठी इन आणि आऊट टाइमची बायोमेट्रिक हजेरी द्यावी लागणार आहे. सलग तीन दिवस लेटमार्क लागला तर एका सीएलच्या कपातीची तरतूद आहे. दौऱ्यांवरील कर्मचाऱ्यांना आस्थापना विभागाला पूर्वसूचना देणे बंधनकारक असल्याने सोयीच्या दौऱ्यांवर व फिरतीवरही बंधने येणार आहेत.

बायोमेट्रिक यंत्रणा लावल्यामुळे कर्मचारी कधी येतात, कधी जातात, याबाबत नेमकी माहिती मिळेल. शिवाय कार्यालयीन कामकाजात सुधारणा करण्यास मदत मिळणार असल्याने परिणामकारक व दर्जेदार कामे शक्‍य होणार आहेत. सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात येणाऱ्या दहा रुग्णालयांत बायोमेट्रिक यंत्रासाठी अंदाजे तीन लाखांचा खर्च लागणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी सांगितले.