भागीदारीत 27 कोटींची फसवणूक; बिल्डर समीर मेहताला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

औरंगाबाद : फ्लॅटसाठी कर्ज देणाऱ्या बॅंकांना बनावट पत्र देऊन भागीदारीतील संयुक्त खात्यात कर्जाचे धनादेश न टाकता 27 कोटी तेरा लाखांची रक्कम स्वत:च्या खात्यात वळवली. या फसवणूक प्रकरणात शहरातील "आर. के. कॉन्स्ट्रो' चे मालक समीर मेहता यांना आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई (ता. 28) ला मध्यरात्रीनंतर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार : विजय मदनलाल अग्रवाल व त्यांचे मित्र कमलकिशोर तायल तसेच गोपाल अग्रवाल (रा. सिडको एन-तीन) यांच्या संयूक्त मालकीच्या "सिद्दीविनायक एंटरप्रायजेस' या फर्मच्या नावाने हिरापूर ता. जि. औरंगाबाद, येथे पाच एकर जमीन आहे. ही जमीन फेब्रुवारी 2011 मध्ये "आर. के. कान्स्ट्रो'चे मालक समीर मेहता यांना त्यांनी विकसीत करण्यासाठी दिली होती. याचा एक करारनामाही करण्यात आला. यात फ्लॅटविक्रीतून आलेली रक्कम "सिद्धीविनायक एंटरप्रायजेस' व आर. के. कॉन्स्ट्रो यांनी महराष्ट्र बॅंकेत उघडलेल्या "फोर्थ डायमेन्शन्स प्रोजेक्‍ट इस्क्रो अकाऊंट' या खात्यात संयुक्तरित्या भरावी असे ठरले होते. जमा होणारी 45 टक्के "सिद्धीविनायक एंटरप्रायजेस' तर उर्वरित 55 टक्के रक्कम "आर. के. कॉन्स्ट्रो' यांना मिळेल असे करारनाम्यात होते. परंतू एकवेळा समीर मेहता यांनी "फोर्थ डायमेन्शन' या संयुक्त खात्यात रक्कम भरणा केली. मात्र, त्यानंतर ग्राहकांना फ्लॅटसाठी कर्ज देणाऱ्या बॅंकांना आपल्या अधिकारातून बनावट पत्र दिले. यात उर्वरित कर्जाचे सर्व धनादेश "आर. के. कॉन्स्ट्रो 4 डी. व आर. के. प्रोजेक्‍ट प्रा. लि.' या खात्याच्या नावाने धनादेश द्यावेत, असे बॅंकांना लेखी कळवले. त्यानंतर ही रक्कम स्वत:च्याच दोन्ही खात्यात जमा करुन घेत स्वत:साठी वापरली. याप्रकरणात फिर्यादी विजय अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, समीर मेहतांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात फसवणूकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर मध्यरात्रीनंतर त्यांना आर्थिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी अटक केली.