महापालिकेच्या आकृतिबंधातून सफाई कामगारांना वगळले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

औरंगाबाद - महापालिका कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला आकृतिबंध चुकीचा आहे. यामध्ये लोकसंख्येच्या निकषानुसार मजुरांचा समावेश करण्यात आलेला नाही, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे, असा आरोप कामगार शक्ती संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात यांनी केला आहे.

महापालिकेतील कर्मचारी-अधिकारी मोठ्या प्रमाणात निवृत्त होत असून, १९८२ नंतर कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नोकरभरती करण्यासाठी शासनाने आकृतिबंध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या आकृतिबंधामध्ये प्रशासनाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप श्री. खरात यांनी केला. सफाई मजुरांची वाढ गृहीत धरण्यात आलेली नाही, शहरातील उद्यानांची संख्या लक्षात घेता माळ्याचे पद भरण्यासंदर्भात उल्लेख नाही. चालकांचाही समावेश केलेला नाही. १५ लाख लोकसंख्येच्या शहराला साडेचार हजार सफाई मजुरांची गरज असताना अवघ्या सोळाशे जणांवर काम सुरू आहे. समाजातील विशिष्ट वर्ग सफाईचे कामे करतो, त्यांना फायदा मिळू नये म्हणून प्रशासनाने ही चाल केल्याचा आरोप खरात यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या संदर्भात प्रशासनाने फेरविचार करावा, पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत आवाज उठवावा, असे आवाहन श्री. गौतम यांनी केले.