एका वायरलेसमुळे अर्ध्या तासातच पाच संशयित पोलिसांच्या जाळ्यात 

एका वायरलेसमुळे अर्ध्या तासातच पाच संशयित पोलिसांच्या जाळ्यात 

औरंगाबाद - कंपनीतून घराकडे जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना मारहाण करून लुटल्याचा प्रकार बुधवारी (ता. दोन) दौलताबाद घाटात मध्यरात्रीनंतर घडला. यानंतर गस्तीवरील पोलिसांनी घटनेची माहिती वायरलेसवरून शहरातील पोलिसांना दिली. दौलताबाद घाटातून शहराकडे येणाऱ्या संशयित लुटारुंच्या जालना रस्त्यावर सापळा लावून पोलिसांनी अर्ध्या तासातच मुसक्‍या आवळल्या. अरबाज खान अझहर खान (वय २१, रा. कबाडीपुरा), नाविद सिद्दीकी अजीम सिद्दीकी (वय २०, जुनाबाजार, बारुदगरनाला), सय्यद सरफोद्दीन सय्यद रियजोद्दीन (वय २१, रा. जुनाबाजार), सोहेल खान फेरोज खान (वय २२, रा. गांधीनगर), शेख शाहरुख शेख हनिफ (वय २४, रा. मुर्गीनाला) अशी अटकेतील पाच संशयितांची नावे आहेत. 

रवींद्र सुरेंद्र फुलारे (वय २५, रा. लोकमान्यनगर, खुलताबाद) हे शेंद्रा येथील पार्किन्स कंपनीत कामाला आहेत. कंपनीतून ते मित्र विशाल देविदास सोमवंशी (वय २६, रा. खुलताबाद) यांच्यासोबत बुधवारी (ता. दोन) मध्यरात्री दीडच्या सुमारास दुचाकीने खुलताबादकडे जात होते. दौलताबाद घाटाच्या वळणावर (एम. एच. २०, एच. ९९७) ही कार उभी होती. कारचे बोनेट उघडे करून पाच तरुण त्या कारजवळ उभे होते. फुलारे यांची दुचाकी आल्याचे पाहून पाचही संशयित रस्त्यावर आले. रस्त्यावर लुटारू उभे असल्याचे लक्षात येताच, फुलारे यांनी दुचाकी वळवली व मागे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, टोळीतील एका तरुणाने फुलारे यांचे मित्र विशाल यांच्या सदऱ्याची कॉलर धरून ओढली. यात विशाल खाली पडले. त्यानंतर संशयितांनी त्यांना मारहाण सुरू केली. लुटारूंच्या कचाट्यात विशाल सापडल्याचे पाहून फुलारे मदतीसाठी धावले. त्यामुळे टोळीतील तरुणांनी फुलारे यांनाही बेदम मारहाण केली व त्यांच्या खिशातील एक हजार रुपये, मोबाईल हिसकावला. त्यानंतर क्षणात ते कारमधून औरंगाबादच्या दिशेने पसार झाले.

संशयितांना असे पकडले 
लुबाडणूक करून टोळीतील संशयित कारने औरंगाबादकडे निघाले. पोठापाठ गस्तीवरील पोलिसांची गाडी दौलताबाद घाटात पोचली. फुलारे यांनी लुबाडणुकीचा प्रकार त्यांना सांगितला. यानंतर तेथील पोलिसांनी लगेचच वायरलेस करून हा संदेश शहरातील पोलिसांना कळवला. यानंतर जालना रस्त्यावर संशयितांची गाडी घेरून पोलिसांनी पकडले. 

दौलताबाद ठाण्यात गुन्हा
संशयित पाच आरोपींविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर फुलारे यांच्यासमोर हजर करून त्यांची पोलिसांनी ओळख पटविली. गुन्ह्यात वापरलेली कार संशयिताकडून पोलिसांनी जप्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com