मुख्य बाजारपेठेत हातगाडीचालकांची पळापळ 

मुख्य बाजारपेठेत हातगाडीचालकांची पळापळ 

औरंगाबाद - शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर, चौकांमध्ये अतिक्रमण करून वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. शनिवारी (ता. १६) मुख्य रस्त्यांवर वाहने फिरवून केवळ कारवाईचा इशारा देण्यात आला. त्यामुळेच हातगाडीचालकांची पळापळ सुरू झाली. आता सोमवारपासून (ता. १८) जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शहरातील पैठण गेट, औरंगपुरा, रंगारगल्ली, सिटी चौक, शहागंज, क्रांती चौक, रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, टीव्ही सेंटर, सिडको बसस्थानक, हर्सूल टी पॉइंट, मुकुंदवाडी, चिकलठाणा, शहानूरमियाँ दर्गा, शिवाजीनगर, गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर, कामगार चौक, सिडको बसस्थानक  यासह इतर चौकांत रात्रीच्या वेळी नागरिकांची वर्दळ असते. त्यात हातगाडीचालक अतिक्रमण करून अर्ध्यापेक्षा अधिक रस्ता ताब्यात घेतात. त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होते. अशा अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. शनिवारी कबाडीपुरा, बुढ्‌ढीलेन, लोटाकारंजा, शहागंज चमन, गांधीपुतळा, सराफा, सिटीचौक, गुलमंडी, पैठणगेट या मार्गावर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने फेरफटका मारला. या वेळी महापालिकेकडे असलेल्या पोलिसांचा फौजफाटादेखील सोबत होता. स्पीकरवरून अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या. आपापली अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्याच्या सूचना करताच हातगाडीचालकांची पळापळ सुरू झाली. त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी मोकळे झाले. रात्री नऊ वाजेपर्यंत महापालिकेच्या पथकाने वर्दळीच्या भागात फेरफटका मारला. आता सोमवारपासून जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पथकात पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग, प्रभाकर पाठक, इमारत निरीक्षक पी. व्ही. गवळी, गंगाधर भांगे, सय्यद जमशीद, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांचा समावेश होता. 

व्यापाऱ्यांनी केले स्वागत 
रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणांमुळे गुलमंडी, रंगारल्ली, टिळकपथ, पैठणगेट येथील व्यापारी त्रस्त होते. या दुकानांसमोर हातगाड्या, फेरीवाल्यांचा मुक्त संचार असतो. दुकानात येणाऱ्या ग्राहकाला दुचाकी वाहनही उभे करण्यासाठी जागा नसते. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com