‘फास्टर फेणे’ला तब्बल तासभर ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - सस्पेन्स स्टोरी आणि थ्रिलरने भरलेल्या बहुचर्चित ‘फास्टर फेणे’ चित्रपटाच्या खेळात व्यत्यय आल्याने शनिवारी (ता. २८) चाहत्यांचा सुमारे तासभर खोळंबा झाला. प्रेक्षकांनी तक्रारी केल्यानंतर केबल जळाल्याचे कारण देण्यात आले. विशेष म्हणजे मल्टिप्लेक्‍सच्या इतर दोन स्क्रीनवर हिंदी सिनेमांचे खेळ व्यवस्थित सुरू होते.

औरंगाबाद - सस्पेन्स स्टोरी आणि थ्रिलरने भरलेल्या बहुचर्चित ‘फास्टर फेणे’ चित्रपटाच्या खेळात व्यत्यय आल्याने शनिवारी (ता. २८) चाहत्यांचा सुमारे तासभर खोळंबा झाला. प्रेक्षकांनी तक्रारी केल्यानंतर केबल जळाल्याचे कारण देण्यात आले. विशेष म्हणजे मल्टिप्लेक्‍सच्या इतर दोन स्क्रीनवर हिंदी सिनेमांचे खेळ व्यवस्थित सुरू होते.

राज्यभरातील प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरलेला ‘फास्टर फेणे’ शनिवारी सकाळी दहाला खडकेश्‍वरच्या अंजली बिग सिनेमामध्ये ‘स्लोअर फेणे’ झाला होता. राष्ट्रगीताविना वेळेवर सुरू झालेला चित्रपट जेमतेम अर्ध्यावर येताच बंद पडला. ‘बॅकग्राउंड म्युझिक’ आणि ‘ड्रोन’ शूटिंगच्या बळावर बाजी मारून जाणारे सीन्स पाहण्यात दंगलेल्या प्रेक्षकांना पडद्यावरील चित्रे अचानक गायब झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याची शंका आली. दरम्यान, मध्यंतर झाले असावे असे वाटून कॅंटीन बॉयदेखील स्नॅक्‍स व कोल्ड्रिंकचे ट्रे घेऊन आत आला. तेव्हा काही तरी गडबड झाल्याचे लक्षात आले. हा खेळ पाहण्यासाठी हर्षवर्धन दीक्षित, रेवा जोशी, अमोल निर्बन, एस. ए. निर्बन, यशप्रीत निर्बन, जी. के. साबळे, सचिन शेळके यांच्यासह सुमारे ३० प्रेक्षक उपस्थित होते. बराच वेळ वाट पाहूनही चित्रपट सुरू झाला नाही. व्यवस्थापनाकडूनही काही कल्पना देण्यात आली नाही. याच वेळी या चित्रपटगृहातील दुसऱ्या दोन स्क्रीनवर मात्र हिंदी चित्रपट व्यवस्थित सुरू होते. तब्बल ५५ मिनिटांनंतर सिनेमा सुरू झाला आणि अवघ्या पाच मिनिटांत मध्यंतर झाले. प्रेक्षकांना पुन्हा पुढची दहा मिनिटे जाहिराती पाहाव्या लागल्या. या सगळ्या प्रकाराची कल्पना चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून देण्यात आली. त्यांनी हा सगळा प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगत, सिनेमागृह व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार करण्यास सांगितले. खेळ संपल्यानंतर प्रेक्षकांनी ड्युटी ऑफिसर नितीन सोनवणे यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली असता, सोनवणे यांनी केबल जळाल्याने तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली.