शहरातील  फूटपाथवर दुकानदारी

शहरातील  फूटपाथवर दुकानदारी

औरंगाबाद - कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांना पायी चालण्यासाठी पेव्हर ब्लॉकने चकचकीत करण्यात आलेल्या फूटपाथला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर फूटपाथच्या जागेवर अनेकांनी हॉटेल थाटली आहेत, तर काहींनी हातगाड्या लावून तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी फूटपाथचा वापर सुरू केला आहे. ‘चिरीमिरी’ची सवय लागलेले महापालिका अधिकारी मात्र हा प्रकार उघड्या डोळ्यांनी वर्षानुवर्षे पाहत आहेत. फूटपाथवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील गुलमंडी, टिळकपथ, औरंगपुरा, मछलीखडक, सराफा, शहागंजसह इतर भागांतील रस्त्यांना हातगाड्यांचा विळखा पडला आहे. कोणी भाजीपाल्यांच्या तर कोणी कपड्यांच्या गाड्या लावून फूटपाथ गिळंकृत करण्यात आले आहेत. दिवाळी-दसरा, ईद यासारख्या सणानिमित्ताने नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडतात. त्यांना मुख्य बाजारपेठेत पायी चालणेही अवघड झाले आहे. महापालिकेने पेव्हर ब्लॉक बसवून फूटपाथ चकचकीत केले आहेत. त्यावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला असला तरी वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिक त्रस्त आहेत. रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या घोषणा करत महापालिकेतर्फे वारंवार मोहिमा हाती घेतल्या जातात. परंतु हे नाटक जास्त काळ टिकत नाही. आजघडीला फूटपाथ फळे-भाजी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या ताब्यात आहेत. अनेकांनी फूटपाथवर हॉटेल, गॅरेजचे व्यवसाय सुरू केले आहेत, तर काही ठिकाणी कार सजावटीचे काम चालते. अनेक ठिकाणी फूटपाथवर बेधडक गाड्या पार्क केल्या जातात. त्यासाठी छत टाकून अतिक्रमणे करण्यात आली आहेत. जळगाव रोडवर इमारतीच्या कामांचे रेती, खडी, विटा हमखास फूटपाथवर टाकले जातात. त्यामुळे महिलांना, नागरिकांना शहरात फूटपाथच शिल्लक नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

हप्तेबाजांचा आशीर्वाद
शहरातील अनेक रस्त्यांवरील अतिक्रमणांना महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आश्रय असल्याचे बोलले जाते. अतिक्रमण करणारे तीन ते चार ठिकाणी हप्ते मोजतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. 

फेरीवाला धोरण ठरेना
राज्याचा विचार केल्यास सर्वाधिक हातगाड्या औरंगाबाद शहरात असल्याचे महापालिकेचे अधिकारी खासगीत सांगतात. या हातगाडीचालकांना परवाने देऊन त्यांच्या थांबण्याची विशिष्ट जागा निश्‍चित करून देण्यासाठी शासनाने महापालिकेला आदेश दिले आहेत. मात्र गेल्या पाच वर्षांपासून हे नियोजन केवळ कागदावरच आहे. फेरीवाला धोरण ठरत नसल्यामुळेच आमच्यावर कारवाई करता येणार नाही, असे हातगाडीचालक महापालिकेलाच बजावत आहेत.

शहरातील व्यापारी त्रस्त 
मुख्य बाजारपेठेत हातगाडीचालक फूटपाथसह अर्धा रस्ताही गिळंकृत करतात. त्यामुळे व्यापारी त्रस्त आहेत. टिळकपथ परिसरातील व्यापाऱ्यांनी नुकतेच महापालिका, पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन हातगाडीचालकांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. मात्र अद्याप हातगाडीचालकांवर कारवाई करण्यात आलेली नाही. 

हरितपट्ट्यात पार्किंग 
फूटपाथवर अतिक्रमणांचा सपाटा सुरू असताना शहरातील हरितपट्टेदेखील सुरक्षित राहिलेले नाहीत. अनेक हरितपट्ट्यांमध्ये झाडे तोडून अतिक्रमण करून जागेचा वापर पार्किंगसाठी केला जात आहे. त्यात मोठे हॉटेल, खासगी शिकवणीवाल्यांचा समावेश आहे. महापालिका प्रशासनाचे याकडेदेखील दुर्लक्ष होत आहे.

अतिक्रमण हटाव विभाग कोमात 
शहरात गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमण हटविण्याची एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अतिक्रमण हटाव विभाग कोमात गेल्याची टीका नगरसेवकांमधून केली जात आहे. महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिवाळीनंतर नाल्यांवरील अतिक्रमणे हटविणे, बीड बायपास रस्त्याचे रुंदीकरण करणे अशा मोहिमा सुरू करण्याची घोषणा केली होती. दिवाळी संपून आठवडा उलटला तरी अद्याप एका ठिकाणीही कारवाई करण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com