घाटीत सुपरस्पेशालिटीच्या कामाला वेग; बांधकाम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

औरंगाबाद  - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) येथे उभारण्यात येत असलेल्या सुपरस्पेशालिटी इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, पदनिर्मिती आणि पदस्थापना करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या विभागात १ हजार ३७९ पदांचा श्रेणी-एक ते चारचा सुधारित स्वतंत्र मनुष्यबळाचा प्रस्ताव घाटीने तयार केला. त्याची छाननी करून तो वैद्यकीय संचालकांकडे सादर करण्यासाठी शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांची नोडल अधिकारी व औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांची अतिरिक्त नोडल अधिकारी म्हणून गुरुवारी (ता. २१) नियुक्तीही करण्यात आली.

घाटीत पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून (पीएमएसएसवाय-३) उभारण्यात येणाऱ्या दीडशे कोटींच्या सुपरस्पेशालिटी विभागाच्या इमारतीचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. सध्या रंगरंगोटी सुरू आहे. डिसेंबरपर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होण्याची शक्‍यता डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केली. त्यानंतर इलेक्‍ट्रिफिकेशन आणि इतर कामे मार्चपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सुपरस्पेशालिटीचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण झाले तर जानेवारीतच पदनिर्मिती व पदनियुक्ती करण्याचा प्रयत्न असेल. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. डीएमईआरचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी गेल्या महिन्यात घाटीत घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केले होते.   

होतील अतिविशेषोपचार उपलब्ध 
१६,१४६ चौरस मीटरच्या भव्य पाचमजली इमारतीत २५३ खाटांचे रुग्णालय, सुसज्ज पार्किंग व न्यूरॉलॉजी, कार्डिऑलॉजी, युरॉलॉजी, नेप्रॉलॉजी, नवजात शिशू, जळीत रुग्ण व प्लास्टिक सर्जरी ट्रॉमा केअर आदी विभागांमार्फत अतिविशेष वैद्यकीय सेवा-सुविधा रुग्णांना देण्यात येतील. त्यामुळे मार्चअखेर घाटीत अतिविशेषोपचार गोरगरिबांना उपलब्ध होऊ शकतील. याशिवाय सर्जरी बिल्डिंग व सुपरस्पेशालिटी विभाग जोडण्यासाठी एक सब-वे करण्याचेही नियोजन सुरू आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी दिली. 

राज्यस्तरीय आढावा समिती स्थापन
पीएमएसएसवाय-टप्पा ३ या केंद्र शासन पुरस्कृत योजनेंतर्गत घाटीला १५० कोटींचा निधी देण्यात आला. त्यामध्ये केंद्र १२० कोटी व राज्य शासनाचा ३० कोटी असा हिस्सा आहे. या कामाच्या प्रगतीबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आढावा समिती गुरुवारी स्थापन करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव उपाध्यक्ष, केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक हे सदस्य आहेत तर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सदस्य सचिव आहेत.