गावोगावी आंदोलनाचे लोन,औरंगाबाद बाजार समिती ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

औरंगाबाद - शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपात आता शिवसेनेसह विरोधी पक्ष सहभागी झाल्याने औरंगाबाद बाजार समितीत फळ भाजीपाल्यासह, धान्य मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले आहेत.

औरंगाबाद - शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपात आता शिवसेनेसह विरोधी पक्ष सहभागी झाल्याने औरंगाबाद बाजार समितीत फळ भाजीपाल्यासह, धान्य मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले आहेत.

शहरातील किरकोळ भाजीपाला मार्केटवरही संपाचा चांगलाच परिमाण झाला असून, सोमवारी (ता. 5) कॉंग्रेस, शिवसेनेसह, मराठा संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बाजार समितीतील व्यवहार बंद केले. तसेच टीव्ही सेंटर, शिवाजीनगर, गारखेड्यासह शहराच्या विविध भागांत सकाळी फेरी मारून बंदचे आवाहन केले. जिल्ह्यात ग्रामीण भागात बंदलाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असला तरी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

शेतकरी संपाचा आज पाचवा दिवस आहे. या संपामुळे औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळभाजीपाला मार्केटमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. सकाळी काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली; मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मराठा संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही दुकाने बंद केली. त्यामुळे फळ- भाजीपाल्यासह, धान्य यार्डातील मार्केट शंभर टक्के बंद झाले. औरंगाबाद शहराला फळ, भाजीपाला, धान्यांचा औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमधूनच पुरवठा होतो. संप असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाला आणलाच नव्हता; मात्र सकाळच्या सत्रात काही प्रमाणात भाजीपाला विक्री होत असल्याची माहिती मिळताच कॉंग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे, मराठा संघटनांचे माणिक शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी बाजार समितीत येऊन सर्व दुकाने बंद केली. त्यामुळे जे ग्राहक खरेदीसाठी बाजारात आले होते त्यांना माघारी जावे लागले. सकाळी 11 वाजता बाजार समितीत शुकशुकाट होता, तर धान्य यार्डातसुद्धा शुकशुकाट बघायला मिळाला.

धान्य मार्केटही बंद
बाजार समितीमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणात आवक-विक्री होते; मात्र संप असल्याने धान्याच्या गाड्या आल्याच नाहीत. संपामुळे धान्य मार्केट यार्डाला कुलूप लावण्यात आले होते.