तलवार खाली ठेवली, म्यान केली नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या चौथ्या दिवशी तो मोडीत काढण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती. एसटी प्रशासनाने खासगी चालकांना बोलावून त्यांच्या हातात एसटीचे स्टेअरिंग सोपवण्याची पूर्ण तयारी केली होती. संप मिटला नसता तर शनिवारी (ता. २१) खासगी चालकांमार्फत बसगाड्या बाहेर काढण्याचे नियोजन होते. दरम्यान, संप मागे घेतला असला तरीही माघार घेतली नाही, सन्मानपूर्वक वेतन वाढले नाही तर जानेवारीमध्ये पुन्हा संप होऊ शकतो, असा इशारा कामगारांनी दिला आहे. 

सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (ता. सोळा) संप सुरु केला होता. संपाच्या तिसऱ्या दिवशी एसटी प्रशासनाने बाहेरगावाहून आलेल्या कर्मचाऱ्यांना विश्रामगृहातून हुसकावण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयोग यशस्वी होत नसल्याने थेट खासगी चालकांमार्फत गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी (ता. २०) रात्री बारापर्यंत एसटीचे अधिकारी आणि परिवहन अधिकारी यांची शासनाच्या आदेशानुसार प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीत आरटीओ कार्यालयाने खासगी चालकांची व्यवस्था करण्याचे शासनाने आदेश दिले असल्याने आरटीओ प्रशासनाने सोळा खासगी चालक आणून एसटीच्या दारात उभे केले. प्रत्येक चालकाचे प्रतिदिन पाचशे रुपये एसटीने भरण्याचा निर्णय झाला होता. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीच न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करत एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने खासगी चालकांना माघारी परतावे लागले, अन्यथा शनिवारी खासगी चालकांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग दिसले असते, त्यातून पुन्हा नवीन संघर्ष दिसला असता. 

कर्मचाऱ्यांच्‍या ग्रुपवर चर्चा
एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा सन्मान राखून संप मागे घेतला, त्याचा अर्थ तलवार म्यान केली असा नाही, अशा शब्दांत कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर चर्चा सुरू आहे. न्यायालयाच्या मध्यस्थीने सन्मानपूर्वक वेतन मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसे शासनाने न केल्यास जानेवारीत पुन्हा संप पुकारला जाऊ शकतो, असा इशारा देऊन कामगारांच्या व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.