वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीस व्हायचंय डॉक्‍टर पण ...

सुषेन जाधव 
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष. तिच्या घरची हलाखीची परिस्थिती. ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी जिवाची तगमग सुरु. अशात नीट परीक्षेत चांगले गुण मिळाले आणि आपण डॉक्‍टर होणार याचा तिला आनंद झाला. मात्र तिचा आनंद काही काळच टिकून राहतो की काय अशी काळजी तिच्या पालक, शिक्षकांना लागली आहे. प्रतीक्षा राजपूत असे तिचे नाव असून तिला शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. 

मुळातच जीवशास्त्र हा प्रतीक्षाचा आवडीचा विषय. अभ्यासातही ती हुशार. बारावीनंतर तिने डॉक्‍टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. अखेर तो क्षणही आला मात्र मेडिकलसारख्या शिक्षणासाठी लागणारा खर्च आपणाला पेलवणारा नाही याने तिला अस्वस्थ करून सोडले आहे. लाखोंवर खर्च असणाऱ्या मेडिकलच्या शिक्षणाचे स्वप्न गरिबांनी बघूच नये का? असा प्रश्‍न पडल्याचे तिने सांगितले. 

प्रतीक्षाचा मेडिकलसाठी लातूरच्या महाविद्यालयात नंबर लागला असून जेमतेम वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला पहिल्या वर्षासाठीच लागणारा खर्च पेलवणारा नाहीय. म्हणून तिच्या पंखाला बळ मिळावे यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. तिला मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी ‘दैनिक सकाळ’शी संपर्क साधावा. आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी ‘गरिबी’ आडवी येते. समाजातील संवेदनशील व्यक्तींचे मन हेलावणारा हा प्रसंग म्हणजे खऱ्या अर्थाने इतरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या समाजातील दानशूर व्यक्तींसाठी एक चांगली संधीच आहे. मूळचे दहेगाव बंगला (ता. गंगापूर) येथील असलेले प्रतीक्षाचे वडील प्रल्हाद राजपूत हे शहरात तब्बल १९ वर्षांपासून वृत्तपत्र विक्री करतात. यातून त्यांनी आतापर्यंत मुलगी प्रतीक्षा आणि सध्या दहावीत शिकणाऱ्या मुलाचा खर्च केला आहे. आज ना उद्या तिच्या लग्नासाठी जमा केलेले पैसेही तिच्या शिक्षणावर खर्च झाले आहेत. तेही पुरेसे नसल्याने पुढच्या खर्चाच्या विवंचनेत असल्याचे तिचे वडील प्रल्हाद राजपूत म्हणाले. प्रतीक्षा ही वेणूताई चव्हाण उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. विद्यालयातून सृष्टी पिंपळे आणि आदिती दळवी यांचाही मेडिकलसाठी नंबर लागला आहे.