अर्ध्या तासातच प्रश्‍नपत्रिका मोबाइलद्वारे बाहेर!

अर्ध्या तासातच प्रश्‍नपत्रिका मोबाइलद्वारे बाहेर!

औरंगाबाद - औरंगाबादेत बी.फार्मसी व पॉलिटेक्‍निकच्या सिव्हील विद्याशाखेची परीक्षा सुरू असतानाच अर्ध्या तासातच प्रश्‍नपत्रिका मोबाइलद्वारे बाहेर आणल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला. सोमवारी (ता. २०) सकाळी साडेदहाला हा प्रकार घडला. प्रश्‍नपत्रिकेद्वारे परीक्षार्थीला बाहेरील संशयित उत्तरांसाठी कॉपी पुरवीत होते. यात महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. तिघांना ताब्यात घेतले असून एकजण पसार आहे.

पोलिसांनी सांगितले, की बीड रस्त्यावरील भालगाव शिवारातील शरदचंद्र पवार पॉलिटेक्‍निक महाविद्यालयात सोमवारी बी.फार्मसी, पॉलिटेक्‍निकच्या सिव्हील विद्याशाखेची परीक्षा सुरू होती. पॉलिटेक्‍निकच्या अंतिम वर्षाचा, तर बी.फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाचा पेपर सकाळी दहाला सुरू झाला. त्यानंतर अर्ध्या तासाने अर्थात साडेदहाला मोबाइलद्वारे पॉलिटेक्‍निक विद्याशाखेच्या काँक्रिट टेक्‍नॉलॉजी या विषयाची प्रश्‍नपत्रिका परीक्षागृहातून बाहेर आणली गेली. त्या वेळी महाविद्यालय परिसरालगतच कारमध्ये बसलेले काहीजण प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नांची उत्तरे गाइडमध्ये शोधून कॉपी परीक्षागृहात पाठवीत होते. सर्रास कॉपी सुरू असल्याची बाब समोर आल्याने या प्रकाराची माहिती चिकलठाणा पोलिसांनी समजली. त्यांनी महाविद्यालय परिसरात जाऊन कारमधील दोन व्यक्तींसह एका परीक्षार्थीला ताब्यात घेतले. दरम्यान, एकजण पसार झाला. पकडलेल्या संशयितांचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले. 

या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेश अंभोरे यांनी तक्रार दिली. त्यानुसार, परीक्षार्थी रवींद्र उत्तम पवार (रा. तोळा नाईक तांडा, ता. जि. औरंगाबाद), अक्षय त्र्यंबक सरकटे (रा. देवखेड, ता. सिंदखेड, जि. बुलडाणा), आशिष जोगदंड यांच्यासह एका मुलीवर संशयावरून गुन्ह्याची नोंद झाली. यात आशिष पसार असून, त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण यांनी दिली.

कोण काय म्हणाले...
पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले, ‘‘साडेबारापर्यंत परीक्षा होती. त्यामुळे या वेळेआधी प्रश्‍नपत्रिका बाहेर येऊ शकत नाही; पण ती आली कशी? या प्रकरणात कुणाचा हात आहे, परीक्षागृहात मोबाइल आला कसा, त्याद्वारे कुणी फोटो काढला, यात आणखी कुणाचा सहभाग आहे काय, या बाबींचा तपास सुरू आहे.

याबाबत शरदचंद्र पवार पॉलिटेक्‍निक महाविद्यालयाने खुलासा केला आहे. महाविद्यालय परिसराबाहेरील बीड हायवेवर पकडलेले विद्यार्थी, पालक व नातेवाइकांना प्राचार्यांच्या कार्यालयात नेले. पोलिसांच्या भरारी पथकाकडे आम्ही त्यांना सुपूर्द केले. पेपर फुटल्याचे वृत्त निराधार असून, या प्रकरणाचा संपूर्ण शोध घेण्यासाठी पोलिस ठाण्यात आम्ही रीतसर तक्रार दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com