प्रश्‍नपत्रिका फुटीप्रकरणी तीन विद्यार्थ्यांना अटक 

प्रश्‍नपत्रिका फुटीप्रकरणी तीन विद्यार्थ्यांना अटक 

औरंगाबाद - तालुक्‍यातील भालगाव परिसरातील शरदचंद्र पवार पॉलिटेक्‍निक महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग परीक्षेच्या पेपरला कॉपी पकडल्याप्रकरणी दोन विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनीस पोलिसांनी अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी बुधवारपर्यंत (ता. २२)  पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील मुख्य आरोपी अतीश जोगदंड याच्यासह अन्य इतर आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

संशयित आरोपींनी मोबाइलवर प्रश्‍नपत्रिकाचे फोटो काढून व्हॉट्‌सॲपवर परीक्षा हॉलबाहेर पाठविले होते. बाहेर बसलेल्या दोन युवकांसहित एक युवती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांस मोबाइलद्वारे उत्तरे पाठवित होती. याप्रकरणी प्राचार्य शैलेंद्र रामराव अंभोरे यांना काही युवक परीक्षा हॉलबाहेरून गाइडची पाने फाडून व्हॉटस्‌ॲपद्वारे परीक्षा देणाऱ्यांना पाठवित असल्याची माहिती मिळाली. प्राचार्य अंभोरे यांनी चिकलठाणा पोलिसांना कळविताच सोमवारी परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्र व परिसरात छापा मारून विद्यार्थी अक्षय त्र्यंबक सरकटे (रा. देवखेड ता. सिंदखेड जि. बुलढाणा), रवींद्र उत्तम पवार (रा. तोलानाईक तांडा ता. औरंगाबाद) आणि विद्यार्थिनी दिव्या सतीश गाजरे अशा तिघांना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली होती.

तिन्ही संशयितांना पोलिसांनी मंगळवारी (ता. २१) न्यायालयात हजर केले. पोलिस कोठडीची मागणी करत सहायक सरकारी वकील सय्यद जरिना यांनी मुख्य संशयित आरोपी जोगदंड याच्यासोबत कोणकोण सहभागी आहे, याचा तपास करावयाचा आहे, असा युक्तिवाद केला. त्यावर मागणी मान्य करत न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

पोलिस देणार  महाविद्यालयाला पत्र
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, महाविद्यालयाला प्रश्‍नावलीचे पत्रच पाठवणार असल्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी मंगळवारी (ता. २१) सांगितले. विशेषत: पसार झालेला संशयित आशिष जोगदंड याच महाविद्यालयात शिक्षण घेतलेला विद्यार्थी असल्याची माहिती समोर आल्याचेही सहायक निरीक्षक ताईतवाले म्हणाले.

पोलिसांचे प्रश्‍न...
परीक्षेचा कालावधी किती, परीक्षेवेळी विद्यार्थ्यांची तपासणी करूनच आत सोडले का? तसे केल्यास मोबाइल परीक्षागृहात आला कसा, गेटवर त्यावेळी कोणकोण कर्मचारी होते, पर्यवेक्षकाची जबाबदारी काय असते, याची माहिती तत्काळ द्यावी, अशी प्रश्‍नावली असून, यावर पोलिस महाविद्यालयाला उत्तरे मागणार आहेत.

तर,पेपरच रद्द करा
परीक्षेदरम्यान प्रश्‍नपत्रिका बाहेर येऊन कॉपीच्या गैरप्रकारामुळे अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या अन्य असंख्य परीक्षार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कॉपीचा प्रकार झालेला पेपरच रद्द करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com