कर्मचाऱ्यांच्‍या घरावर कोसळल्या जलकुंभाच्या पायऱ्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

औरंगाबाद - पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावर जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीच्या पायऱ्यांचा स्लॅब कोसळल्याची घटना सिडको एन-७ भागात सकाळी सहाला घडली. त्यात सुदैवाने तीनजण बालंबाल बचावले. दरम्यान, आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी टाकीची पाहणी करून कर्मचारी निवासस्थान तातडीने रिकामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

औरंगाबाद - पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावर जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीच्या पायऱ्यांचा स्लॅब कोसळल्याची घटना सिडको एन-७ भागात सकाळी सहाला घडली. त्यात सुदैवाने तीनजण बालंबाल बचावले. दरम्यान, आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी टाकीची पाहणी करून कर्मचारी निवासस्थान तातडीने रिकामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

सिडको एन-सात येथे सिडको-हडको भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी सिडको प्रशासनाने तीन पाण्याच्या टाक्‍या बांधल्या आहेत. त्यातील ११ लाख लिटर क्षमतेची टाकी अत्यंत जीर्ण झाली आहे. याच पाण्याच्या टाकीलगत कर्मचाऱ्यांसाठी दोन खोल्या असून, त्यात संजय गोकूळ जेजूरकर, मोहन चांदोरे हे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी कुटुंबासह गेल्या पंधरा वर्षांपासून राहतात. पहाटे जेजूरकर व चांदोरे हे दोघे कामावर गेले. जेजूरकर यांच्या घरात चारजण, तर चांदोरे यांच्या घरात तीनजण होते. सकाळी सहाच्या सुमारास पायऱ्यांचा स्लॅब या पत्र्याच्या निवासस्थानावर कोसळला. या वेळी मोठा आवाज झाला व पत्रा वाकून स्लॅबचा मोठा भाग जेजूरकर यांच्या घरात पडला. त्यालगतच रितिका जेजूरकर, सार्थक व नीराबाई या वृद्धा झोपलेल्या होत्या. सुदैवाने हे तिघे बालंबाल बचावले. या मलब्याखाली टीव्ही व एक दुचाकी दबून मोठे नुकसान झाले.

४२ वर्षांपूर्वीचे बांधकाम 
जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम १९७५ म्हणजेच तब्बल ४२ वर्षांपूर्वी झालेले आहे. मात्र, अद्याप या धोकादायक टाकीचा वापर सुरूच आहे. टाकीचा वापर  बंद केल्यास सिडकोतील तेरा वॉर्डांचा पाणीपुरवठा बंद होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाची चालढकल सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोन दिवसांत तपासणी 
शहरातील अनेक पाण्याच्या टाक्‍या जीर्ण झाल्या असून, त्याची तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दोन दिवसात याबाबत अहवाल सादर होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

धोकादायक निवासस्थाने रिकामी करा
आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दुपारी जलकुभांची पाहणी केली. कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या दोन्ही खोल्या तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश दिले. जिन्सी भागातही धोकादायक जलकुंभ असून, तेथील निवासस्थाने रिकामी करण्याची सूचना त्यांनी दिली. पायऱ्या पडलेल्या टाकीचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे त्याचा वापर थांबवून नवीन पाण्याची टाकी बांधावी लागणार आहे. त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या. पायऱ्यांचा उर्वरित भाग पडण्याचा धोका असून, अनुचित प्रकार घडू नये म्हणून, वाहने उभी न करण्याच्या सूचना नगरसेवक नितीन चित्ते यांनी केली. या वेळी कार्यकारी अभियंता सरताचसिंग चहेल, राहुल रोजतकर यांची उपस्थिती होती.