लक्षात ठेवा, खचण्यातच खरा पराभव असतो : अविनाश धर्माधिकारी

Avinash Dharmadhikaris Shiv Chhatrapati Lecturement at Latur
Avinash Dharmadhikaris Shiv Chhatrapati Lecturement at Latur

लातूर : स्पर्धा परीक्षेत अपयश आले म्हणून देदिप्यमान बुद्धीमत्ता असलेली मुलेसुद्धा खचतात. मी इतका अभ्यास केला, मला काय मिळाले ? असे म्हणतात आणि मोडून पडतात. लक्षात ठेवा, नापास होण्यात नव्हे तर खचण्यातच खरा पराभव असतो. स्पर्धा परीक्षा हे व्यक्तीमत्व घडणारे माध्यम आहे, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. दरवर्षी शेकडो मुले आयएएस होतात. पण, त्यांनी काय दिवे लावले, त्यांना तळागाळातील सुखंदु:खं किती माहिती आहेत, हे महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.  

लातूर महापलिकेच्या श्री शिवछत्रपती ग्रंथालयाच्या वतीने शिवछत्रपती व्याख्यानमालेत धर्माधिकारी यांनी 'स्पर्धेची आव्हाने पेलताना' या विषयावर तरुणांशी संवाद साधला. यावेळी सभागृह तरुणांच्या उपस्थितीने तुडूंब भरले होते. महापौर सुरेश पवार, आयुक्त कौस्तूभ दिवेगावकर, उपायुक्त हर्षल गायकवाड उपस्थित होते.

धर्माधिकारी म्हणाले, 'आपल्या जीवनाचा संकल्प काय, हे आपल्याला माहिती हवे. लोकांचे कल्याण करता-करता माझीही प्रगती होत राहिल, असा संकल्प असायला हवा. पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान या बाबी क्षणभंगूर असतात. चांगले गुण, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश, खूप पैसा म्हणजे यश नाही. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांच्या, विशेषत: तळागाळातील लोकांच्या अडचणी सोडवण्यात खरे यश असते.' मी आयएएस होण्याआधी वेगवेगळ्या सामाजिक चळवळींशी जोडला गेलो होतो. निर्धुर चुलीपासून साक्षरतेच्या वर्गापर्यंतच्या चळवळीत भाग घेतला होता. त्यातून खूप काही शिकायला मिळाले, असा अनुभवही त्यांनी सांगितला. 

काही विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या सारख्या बदल्या होतात. म्हणून नाराज होताना दिसतात. पण तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हाला कोठेही पाठवले तरी तुम्ही चांगलेच काम करता. अशा प्रकारची हिंमत नसणारे नाराज होतात. सरकार कोणतेही असो ते तुमची दर चार-सहा महिन्यांनी बदली करत असतील तरी बिचकू नका. तुमचे केवळ स्वच्छ कारभार आणि चांगला अधिकारी होण्याकडे लक्ष असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com