आंतरराष्ट्रीय फोटो कॉन्टेस्टमध्ये बैजू पाटील यांना सुवर्णपदक 

आंतरराष्ट्रीय फोटो कॉन्टेस्टमध्ये बैजू पाटील यांना सुवर्णपदक 

औरंगाबाद - युरोपमधील सर्बिया येथे घेण्यात आलेल्या फेडरेशन इंटरनॅशनल आर्ट फोटोग्राफी स्पर्धेत प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी काढलेल्या खोकडाच्या छायाचित्रास सुवर्णपदक मिळाले. यामुळे जागतिक पातळीवरील या स्पर्धेत औरंगाबादचा झेंडा डौलाने फडकला. दर दोन वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेत 45 देशांच्या स्पर्धकांमधून भारताला पहिले स्थान मिळणे मानाचे समजले जाते, अशी माहिती श्री. पाटील यांनी सोमवारी (ता.14) पत्रकार परिषदेत दिली. 

आपल्या या यशाविषयी माहिती देताना बैजू पाटील म्हणाले, की या स्पर्धेसाठी गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न करीत होतो. या स्पर्धेत जगभरातील 45 देश सहभागी होत पाच ते दहा उत्कृष्ट वन्यजीव छायाचित्रे पाठवत असतात. या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यात काढलेल्या खोकडाच्या (इंडियन फॉक्‍स) छायाचित्राने वैयक्‍तिक प्रिंट प्रकारात पहिला क्रमांक पटकावला. छायाचित्रणात एफआयएपी ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते. या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी सहा वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. 2014 मध्ये याच स्पर्धेत आपण कांस्यपदक मिळवले होते. भारतातून या स्पर्धेसाठी बंगळुरू, कोलकता, चेन्नई, येथील छायाचित्रकार त्यांची छायाचित्रे पाठवत असतात. भारताला या स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले. 

बीडला सापडला खोकड 

खोकडाचे छायाचित्र घेण्यासाठी श्री. पाटील मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातच्या अभयारण्यांत फिरले. मात्र हा लाजाळू प्राणी उजाड भागात आढळतो. हा प्राणी सूर्यास्तानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर पडतो आणि सूर्योदयापूर्वी परत जातो. या दोन्ही वेळांत त्यांचे फोटो घेणे म्हणजे मोठे कसब होते. बीड जिल्ह्यात शिरुर कासार परिसरात पाइपलाइनमधून थेंब-थेंब पाणी गळत असून येथे काही प्राणी येत असल्याचे तेथील सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितले. खोकडाचा फोटो घेण्यासाठी ते सात दिवस एकाच झाडाखाली थांबले. आठवड्याभराने एक खोकड दोन पिलांसह तेथे दिसले आणि एक पिलू आपल्या आईशी खेळत असतानाचे छायाचित्र महत्प्रयासाने घेता आले, असेही बैजू पाटील यांनी सांगितले. 

ग्रामीण भागात प्राणीदर्शन सुलभ 

वन्यजीव छायाचित्रणासाठी बहुतांश छायाचित्रकार अभयारण्याच्या दिशेने जातात; परंतु ग्रामीण भागात शेतांमध्ये अनेक प्राण्यांचे उत्कृष्ट छायाचित्रण होऊ शकते. त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाऊ शकते, असेही बैजू पाटील यांनी सांगितले. 

शासनाकडून प्रोत्साहन मिळावे 

बैजू पाटील यांना वन्यजीव छायाचित्रणात नऊपेक्षा अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने श्री. पाटील हे शाळा, महाविद्यालयांत जनजागृतीचे कार्यक्रम घेतात; परंतु भारत सरकार किंवा राज्य सरकारकडून एकदाही कौतुक झाले नसल्याची खंत त्यांनी या वेळी बोलून दाखविली. 

जानेवारीत होणार बक्षीस वितरण 

छायाचित्रकारांसाठी मानाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत पहिला येण्याचा मान औरंगाबादला मिळाल्याने जगभरातून बैजू पाटील यांचे कौतुक होत आहे. या स्पर्धेसाठी बैजू पाटील यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये फोटो काढला आणि जूनमध्ये पाठविला. याचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला. अडीच लाख रुपये रोख आणि गोल्ड मेडल, असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. सर्बिया येथे जानेवारी 2017 मध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com