१७ सप्टेंबरपर्यंत बायपास सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

गडकरी, फडणवीस यांच्या बैठकीत निर्णय, बिंदुसरा नदीवरील बंधारा व पूल बांधकामाची तत्काळ निविदा काढण्याचे आदेश

बीड - शहरातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निजामकालीन बिंदुसरा नदीवरील पुलाची कालमर्यादा संपल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे. पर्यायी मार्गही वाहून गेल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे बायपासचे काम त्वरित करून हा रस्ता १७ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. आठ) दिले. 

आमदार विनायक मेटे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला श्री. गडकरी, श्री. फडणवीस यांच्यासह बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, आमदार मेटे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, राजेंद्र मस्के उपस्थित होते. खचलेला पूल आणि वाहून गेलेल्या पर्यायी रस्त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणपती आरतीसाठी श्री. मेटेंच्या घरी आल्यानंतर श्री. मेटेंनी हा विषय त्यांच्याकडे मांडला होता. त्यावरून ही बैठक झाली.

या वेळी नितीन गडकरी यांनी पुलाच्या कामाची तत्काळ निविदा काढून काम सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच होणारा नवीन पूल हा बंधारा असलेला करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. चौपदरी बाह्यवळण रस्त्याची एक बाजू १७ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत सात दिवसांच्या आत पर्यायी रस्ता दुरुस्त करून तो सुरू करावा, या पर्यायी रस्त्यावरून अवजड वाहने वगळता दुचाकी, तीनचाकी, चारचाकी बस यांच्यासाठी हा पर्यायी रस्ता खुला करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 
दरम्यान, १२ व १३ या कामांच्या पाहणीसाठी आयआरबी कंपनीचे पथक बीडला येणार आहे. या बैठकीला मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.