बीड जिल्ह्यात बंद सुरूच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

अकरा ठिकाणचे आठवडे बाजार बंद, बीड, घाटनांदूरमध्ये अल्प प्रतिसाद

अकरा ठिकाणचे आठवडे बाजार बंद, बीड, घाटनांदूरमध्ये अल्प प्रतिसाद

बीड - मुख्यमंत्री व काही तथाकथित नेत्यांनी शेतकरी संप मागे घेतल्याची घोषणा केली असली, तरी जिल्ह्यात ‘बंद’ सुरूच आहे. उलट शेतकऱ्यांना संप मागे घेतल्याचे सांगणाऱ्या जयाजी सूर्यवंशी यांना नेटकरी दोन दिवसांपासून सोशल मीडियावर झोडपून काढत आहेत. संपाच्या चौथ्या दिवशी रविवारी (ता. चार) जिल्ह्यातील अकरा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले. बीड व घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथील बाजार बंदला अल्प प्रतिसाद मिळाला; पण ग्रामीण भागातून शहरांमध्ये येणारे दूध बंद झाल्याने परिणाम जाणवू लागले आहेत. सोमवारी (ता. पाच) बंदचे आवाहन करण्यात आले आहे. 

रविवारी माजलगावसह तालुक्‍यातील तालखेड, मोरेवाडी (ता. अंबाजोगाई), साक्षाळपिंपरी (ता. बीड), गेवराई तालुक्‍यातील उमापूर, रोहितळ, रामपुरी, धनेगाव (ता. केज) व निरगुडी (ता. पाटोदा) येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले. बीड व घाटनांदूरमध्ये आठवडे बाजार भरविण्यात आला; पंरतु अल्प प्रतिसाद मिळाला. गर्दी नसल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
बीड, उमापूर, रामपुरी, मोरेवाडी, साक्षाळपिंपरी, रोहितळ, घाटनांदूर व तालखेडमध्ये व निरगुडी येथे प्रत्येक रविवारी भरणारा आठवडे बाजार या वेळी सकाळपासूनच बंद होता. बीडमध्येही सकाळपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात शेतकरी, व्यापारी बाजारात येण्यास सुरवात झाली. शेतकरी संप सुरू असताना हा बाजार कसा भरला? याबाबत काही शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर काही शेतकरी विक्रेत्यांनी आपल्या वस्तू माघारी नेल्या. अंबाजोगाई तालुक्‍यातील घाटनांदूरमध्येही भाजीपाल्यांसह जनावरांचा बाजार भरला; परंतु गर्दी नव्हती. तालखेड, मोरेवाडी, साक्षाळपिंपरी, उमापूर, रोहितळ, रामपुरी, धनेगाव, माजलगाव व निरगुडी येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला. येथील व्यापारी, शेतकऱ्यांनी बाजार बंद ठेवून संपात सहभाग नोंदविला. व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद ठेवत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. 

घाटसावळी (ता. बीड व रायमोह (ता. शिरुर) या दोन गावांचाही बाजार बंद ठेवण्यात आले. दरम्यान, शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (ता. पाच) धारूरमध्ये आंदोलन करण्यात येणार असून बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे. मोरेवाडीत भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करण्यात आला.