बीडमध्ये जानेवारीत लेखिका साहित्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

बीड - मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणारे आठवे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन जानेवारी महिन्यात बीडमध्ये होणार आहे. या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी अहिल्यादेवी होळकर महिला प्रतिष्ठानने घेतली असून संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार ऍड. उषा दराडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बुधवारी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना ठाले पाटील म्हणाले की, मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून लेखिका साहित्य संमेलनाचा उपक्रम राबविला जातो. राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत मराठवाड्यातील स्त्री शिक्षणाच्या प्रवाहात शंभर वर्षे उशिरा आली. त्यामुळे त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी स्त्रियांना स्वतंत्र मंच देण्याच्या हेतूने लेखिका साहित्य संमेलन "मसाप'ने सुरू केलेले आहे.