पर्यायी पुलावरून जड वाहतूक पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले मजबुतीचे प्रमाणपत्र

बीड - मुख्य पूल कमकुवत झाल्यानंतर बनवलेला पर्यायी पूलही पहिल्या पावसात खचल्यामुळे येथून जड वाहनांची वाहतूक बंद होती. दरम्यान, दुरुस्तीनंतर हा पूल मजबूत असल्याचे प्रमाणपत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्यानंतर शनिवारपासून (ता. १५) येथून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली. 
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवरील पुलाचे आयुर्मान संपल्याने मागच्या वर्षीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे.

७८ वर्षे जुन्या असलेल्या पुलाच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्चही झाला; मात्र गेल्यावर्षी आलेल्या महापुरानंतर या पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली. 

दरम्यान, त्यानंतर पुलाच्या उत्तरेला पर्यायी पूल उभारण्यात आला. शहरातून बंद केलेली व गढीहून माजलगाव, तर मांजरसुंबावरून पाटोदा मार्गे वळवलेली वाहतूक पुन्हा या पुलावरून सुरू झाली; मात्र यंदाच्या पहिल्याच पावसात हा पूल खचला. त्यामुळे पुन्हा जड वाहनांची वाहतूक थांबविण्यात आली; मात्र दुरुस्तीनंतर जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला. मोठा पाऊस येऊन पुलावरून पाणी वाहेपर्यंत धोका नसल्याचे प्राधिकरणाने कळवले. त्यानंतर गुरुवारी (ता. १३) जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, आयआरबी कंपनीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यात बैठक होऊन पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शनिवारपासून या पर्यायी पुलावरून जड वाहतूकही सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांचा वाया जाणारा वेळ आणि इंधन खर्च वाचणार आहे.