औष्णिक विद्युत केंद्राला हरित लवादाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

बीड - परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील वीज निर्मितीदरम्यान होणाऱ्या प्रदूषणाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवाह आणि उत्सर्जन निरीक्षण प्रणाली बसविण्यास अपयशी ठरलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्राला हरित लवादाने शुक्रवारी (ता.१४) नोटीस बजावली आहे.

परळी औष्णिक विद्युत केंद्रास प्रवाह आणि उत्सर्जन निरीक्षण प्रणाली न बसविल्याबद्दल हरित लवादाने नोटीस बजावली आहे. पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत मंडळाने जुलै २०१५ मध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना ही प्रणाली बसविण्याचे आदेश दिले होते. परळी येथील ८ संचातून कोळसा जाळून वीज तयार होत असून त्यामुळे सर्वाधिक प्रदूषण निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर परळी येथील प्रदूषण नियंत्रण समितीने वारंवार आंदोलने करून निरीक्षण प्रणाली बसविण्याबाबत विनंती केली होती.

पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार प्रवाह आणि उत्सर्जन निरीक्षण प्रणाली बसविणे आवश्‍यक होते. परळी औष्णिक विद्युत केंद्राकडून हरित लवादाच्या निर्देशाला समाधानकारक प्रतिसाद मिळाला नव्हता. या पार्श्‍वभूमीवर परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रास हरित लवादाने नोटीस बजावून दंड ठोठवावा, अशी मागणीही एका याचिकेद्वारे केली आहे.

बलेंदू शेखर यांनी याबाबत देशभरातील औष्णिक प्रकल्पाबाबतच्या प्रदूषणाबद्दल याचिका दाखल केली आहे. दरम्यान, परळी शहरातील वीज केंद्रातून सध्या वीजनिर्मिती थांबविली गेली असली तरी भविष्यात वीजनिर्मिती प्रकल्प सुरू होणारच आहेत.