दिवाळीच्या पणत्या उजळत असताना तरुण रत्नाकरच्या आयुष्यात अंधार

दिवाळीच्या पणत्या उजळत असताना तरुण रत्नाकरच्या आयुष्यात अंधार

बीड, ता. २३ : गुंठाभर जमिन नाही, राहायला स्वत:चे घरही नाही. पण, कबाड कष्ट करुन तीन मुलींचे लग्न लावले आणि मुलालाही शिकवले. १० वी नंतर आयटीआय शिकलेल्या मुलाने चांगले गुण घेऊन महावितरणमध्ये तंत्रज्ञ (लाईनमन) म्हणून नोकरी मिळवली. आता भविष्य सुखकर होईल अशी आशा घोडके कुटूंबाला होती. तसा स्वत:च्या कामात तरुण रत्नाकर तरबेज होता. पण, सर्वत्र दिपावळीच्या पणत्या पाजळत असतानाच ऐन पाडव्याच्या दिवशीच तरुण रत्नाकरच्या आयुष्यात आणि घोडके कुटूंबियांच्या भविष्यात अंधार पसरला आहे. 

रत्नाकर अभिमान घोडके (वय २४, रा. विडा, ता. केज) याला रोहित्र दुरुस्त करताना वीजेचा धक्का बसल्याने त्याचा उजवा हात निकामी झाल्याने तो शरिरापासून दुर करावा लागला. तर डावा पायही अधू झाला आहे. विडा (ता. केज) येथील घोडके कुटूंबिय मुळ बीड तालुक्यातील मन्यारवाडी येथील. व्यवसाया निमित्त ते मागील ४० वर्षांपासून विडा येथे राहते. त्यांना दोन्हीकडेही गुंठाभरही जमिन नसून सध्या राहत असलेले घर नातेवाईकांचे आहे. अभिमान घोडके हे लोहारकीचा व्यवसाय करतात. हातावरचे पोट असलेल्या अभिमान घोडकेंनी कबाड कष्ट करत तीन मुलींचे लग्न केले. सर्वात लहान असलेला मुलगा रत्नाकर शाळेत असल्यापासून हुशार होता. दहावीत चांगले गुण मिळवून त्याने आयटीआयला प्रवेश मिळवला. चांगले गुण मिळाल्याने त्याला चार वर्षांपूर्वी महावितरण कंपनीत तंत्रज्ञ म्हणून नगर जिल्ह्यात नोकरी मिळाली. सुरुवातीचे तीन वर्षे कंत्राटी तत्वावर नोकरीला असल्याने तुटपुंजा पगार मिळत होता. पण, ‘दिवस जातील आणि भोग सरेल’ अशी अशा या कुटूंबियांना होती. योगायोगाने नुकताच रत्नाकरचा कंत्राटी कालावधी संपला आणि त्याला स्वत:च्या जिल्ह्यात नोकरी मिळाली. सध्या तो चिंचवण वीज उपकेंद्रात कार्यरत होता. मागच्या आठवड्यात सर्वत्र दिपावळीची धावपळ सुरु होती. सर्वांच्या घरासमोर पणत्या पाजळत होत्या. पण, हाच दिवस घोडके आणि रत्नाकर कुटूंबियांच्या आयुष्याला अंधारात लोटणारा ठरला.

ऐन पाडव्याच्या दिवशी तो या उपकेंद्राअंतर्गत असलेल्या सोन्नाखोटा येथे शेती रोहित्राची दुरुस्ती करत असताना त्याला वीजेचा धक्का बसला. यामध्ये त्याचा पुर्ण हात निकामी झाला असून पायही अधू झाला. सध्या त्याच्यावर औरंगाबाद येथील रेबडी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याचा उजवा हात शरिरापासून काढून टाकला आहे. त्यामुळे यापुढे त्याला नोकरीही करता येणार नाही. ऐन तारुण्यात अपंगत्व आल्याने वृद्ध वडिलांसह स्वत:चे आयुष्य कसे काटायचे असा यक्षप्रश्न रत्नाकर समोर आहे.

आयुष्य तर अंधारात खर्चही अशक्य

हातावर पोट असलेल्या घोडके कुटूंबातील रत्नाकर घोडके याला वीजेचा धक्का बसल्याने त्याचा हात शरिरापासून काढून टाकण्याची शस्त्रक्रीया औरंगाबादच्या रेबडी रुग्णालयात झाली. शेवटपर्यंत दहा लाखांचा खर्च लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. महावितरण कंपनीकडून काही प्रमाणात वैद्यकीय खर्च उचलला जात असला तरी कागदोपत्री प्रक्रीया होण्यास उशिर आहे. त्यामुळे विड्यातील लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पण, एवढा खर्च अशक्य असल्याने मदतीचे आवाहन घोडके कुटूंबियांनी केले आहे. मदत करु इच्छिणाऱ्यांनी (रत्नाकर अभिमान घोडके, बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा पाथर्डी, अहमदनगर, खाते क्रमांक : ६०१८३२००५९३, आयएफएससी कोड : एमएएचबी००००१३८. 

महावितरणच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी कंत्राटी कालावधी पुर्ण करुन जिल्ह्यात नोकरीला आलेल्या रत्नाकर घोडके याला महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही पुर्णवेळ सेवेत घेतल्याचे पत्र दिले नाही. त्यामुळे त्याला अद्यापही कंत्राटी तत्वावरील तुटपुंजे वेतन मिळत होते. आयुष्यासाठी अपंग झाल्यानंतर तरी महावितरण मधील फाईली लवकर पुढे सरकणार कि आणखी पहिले पाढे पंचावन्न असाच कारभार राहणार असा प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com