ब्लास्टिंगच्या आवाजाने महसूल विभागाचे कान बधिर!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

बीड - गेवराई तालुक्‍यातील मिरकाळा आणि तळेवाडी येथे सुरु असलेल्या क्रशर चालकांकडून महसूलच्या अनेक नियमांचे उल्लंघन होत आहे. धुळीमुळे प्रदूषण आणि आजार वाढत आहेत, तसेच ब्लास्टिंगच्या आवाजाच्या हादऱ्याने घरांना तडे जात असताना गेवराईच्या महसूल विभागाचे कान मात्र बधिर झाले की काय, असा प्रश्न पडत आहे.

गढीजवळील (ता. गेवराई) तळेवाडी, मिरकाळा येथे काही खडी क्रशर सुरु आहेत. या ठिकाणी ब्लास्टिंग घेताना मोठा आवाज होत असल्याने तळेवाडी, मिरकाळा परिसरात असलेल्या गढी, खांडवी, शिंदेवाडी, खांडवी तांडा, गढी कारखाना कॉलनी आदी काही गावांत हादऱ्यांमुळे घरांना तडे तसेच छतांचे तुकडे खाली पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

खडी क्रशर गावापासून किमान चार-पाच किलोमीटर अंतरावर असण्याचा नियमही पायदळी तुडवला आहे. पिकांवर धुरळा पडल्याने उत्पन्न घटत आहे. ब्लास्टिंगच्या नेहमीच्या आवाजाने लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा सर्व प्रकार सर्रास सुरू असताना कुठलीही कारवाई होत नसल्याने गेवराईच्या महसूल विभागातील गौण खनिज विभागातील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारी आणि वरिष्ठांचीही संबंधितांनी मर्जी संपादन केल्याचा संशय आहे.