आता ‘तिची’ न्यायालयात धाव

आता ‘तिची’ न्यायालयात धाव

बीड - येथील जिल्हा पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी एक महिन्याची रजा मागून लिंगबदलानंतर पोलिस दलात ‘पुरुष’ म्हणून रुजू करून घेण्याची मागणी केली होती. अशी कोणतीही तरतूद नसल्याने तिचा अर्ज पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी नाकारला आहे. त्यामुळे पोलिस भरती अधिनियमनात बदल करण्यासाठी व लिंगबदलानंतरही आपली नोकरी कायम राहावी यासाठी संबंधित पोलिस महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

शरीरातील हार्मोन्समध्ये बदल जाणवू लागल्याने येथील पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचाऱ्याने मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेतली. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार तिने लिंगबदल शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. यासाठी तिने रजेचा अर्ज केला. लिंगबदल केल्यानंतर आपणास ‘पुरुष’ कर्मचारी म्हणून पोलिस दलाच्या सेवेत कायम ठेवण्याची मागणी केली. 

रजा देण्याचा अधिकार असला तरी लिंगबदलानंतर सेवेत ठेवण्याबाबतची मागणी आपल्या कार्यकक्षेत येत  नसल्यामुळे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा अर्ज श्री. माथूर यांच्याकडे निर्णयास्तव पाठविला होता. या प्रकरणातील महिलेची निवड महिला गटातून झाली आहे, लिंगबदलानंतर तिचा गट बदलत असल्यामुळे तिला पुरुष म्हणून पोलिस सेवेत ठेवण्याचा प्रस्ताव श्री. माथूर यांनी नाकारला. यानंतरही संबंधित पोलिस महिला लिंगबदलाच्या निर्णयावर ठाम असून कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत आहे. 

उंची मर्यादेची अट अन्‌...
महिला कोट्यातून ‘ती’ पोलिस दलात भरती झाली आहे. लिंगबदलानंतर पुरुष पोलिस कर्मचाऱ्यासाठीच्या शारीरिक पात्रता अटीत ती बसत नाही. शिवाय, महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती सेक्‍शन चारमध्ये पुरुषासाठी १६५ व महिलेसाठी १५७ सेंटीमीटर उंचीची पात्रता अट आहे. संबंधित महिलेची उंची १६२.७ सेंटीमीटर असून ती पात्रता अटीसाठी पात्र ठरत नसल्याचे समोर आले आहे. असे असले तरी ती अजूनही लिंगबदल शस्त्रक्रियेच्या निर्णयावर ठाम असल्याने तिच्या नोकरीवर गंडांतर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तिने आता कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला असून वकील अजीज नक्वी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महिला व पुरुषांच्या पोलिस भरतीसाठीची उंचीची मर्यादा असणारे महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती सेक्‍शन चार रद्द करण्यासाठी तिने याचिका सादर केली असल्याचे समजते. 

संबंधित पोलिस महिलेने लिंगबदल केल्यास तिच्या नोकरीवर गदा येऊ शकते. असे होऊ नये म्हणून तिने रीतसर न्यायालयात धाव घेतली आहे.
- ॲड. अजीज अब्बास नक्वी, वकील, मुंबई उच्च न्यायालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com