कधी संपणार सांगा, रांगेमधील वनवास हा?

पांडुरंग उगले
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

माजलगाव - नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदी झाल्यानंतर सुरू झालेला रांगेचा प्रवास आजही काही केल्या संपत नाही. मागील दहा महिन्यांपासून नोटबंदी, पीकविमा आणि आता कर्जमाफी यासाठी सुरू असलेला शेतकऱ्यांचा रांगेचा प्रवास आजही अखंड सुरूच आहे. यामुळे दैनंदिन कामकाज सोडून, रोजगार बुडवून, सणासुदीच्या काळातही बॅंकेसमोर रांगेत थांबणारे शेतकरी ‘कधी संपणार सांगा, रांगेचा वनवास हा?, असा प्रश्‍न उपस्थित करीत आहेत.

ग्रामीण भागातील शेतकरी पूर्वी मोठ्या शहरांमध्ये गेल्यावर शहर बस, लोकल रेल्वेचे तिकीट यासह प्रत्येक गोष्टीसाठी रांगेत थांबलेल्या नागरिकांकडे कुतूहलाने बघायचे. गावाकडे आल्यावर मोठ्या शहरातील रांगेची गावाकडे चर्चाही करीत असे; परंतु मागील दहा महिन्यांपासून अशाच रांगेत बॅंकेसमोर थांबण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. ‘आपलं शेत भलं अन, आपलं काम भलं’ असे म्हणून दोन-दोन महिने शहराकडे न फिरकणारे शेतकरी नोटबंदीपासून दिवसभर बॅंकेसमोर रांगेत थांबत आहेत. 

नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केला अन्‌ शेतकऱ्यांच्या नशिबी रांगेचे दुष्टचक्र सुरू झाले. जुन्या नोटा बदलून नव्या घेण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसाला दिवसभर उन्हातान्हात बॅंकांसमोर रांगेत थांबावे लागले. त्यानंतर दिवसरात्र कष्ट करून शेतात पिकवलेली तूर शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर विकण्यासाठी पुन्हा रांगा लावाव्या लागल्या. प्रधानमंत्री पीकविमा योजनेचे फॉर्म भरण्यासाठी पहाटेच रूमालात भाकरी बांधून शहरात आलेल्या शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत रांगेत थांबावे लागले. या रांगा संपत नाहीत तोच आता शासनाने दिलेली कर्जमाफी मिळविण्यासाठी बॅंक, महा ई- सेवा केंद्रासमोरील रांग पुन्हा नशिबी आली. 

शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांवर रांगेत थांबविण्याची वेळ आली आहे. यासाठी शासनाने पुरेशा सुविधा उपलब्ध कराव्यात अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्‍त होत आहे. शेतकऱ्यांना रांगेत थांबावे लागू नये, यासाठी शासन काहीच उपाययोजना करीत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.

शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली खरी; परंतु त्यासाठी लादण्यात आलेल्या किचकट अटींमुळे शेतकरी वैतागले आहेत. अगोदर कर्जखात्याचा तपशील मिळविण्यासाठी बॅंकेसमोर तर, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महा ई- सेवा केंद्रासमोर रांगच नशिबी आहे.
-संदीपान उगले, शेतकरी

टॅग्स