वार्षिक सरासरीच्या २७ टक्केच पाऊस

पांडुरंग उगले 
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

माजलगाव - पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी तालुक्‍यात वार्षिक सरासरीच्या केवळ २७ टक्केच पाऊस झाला आहे. सुरवातीच्या पावसावर पेरणी केलेली खरिपाची पिके पावसाअभावी सुकून जात असून काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात पाळ्या घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरिपाची पिके धोक्‍यात आली आहेत. दिवसभर ऊन-सावलीचा खेळ अन्‌ सोसाट्याचा वारा, रात्री पडत असलेले टिपूर चांदणे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सलग तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या बीड जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला होता. परतीच्या जोरदार पावसाने खरिपासह रब्बीची पिके जोमात आली होती. जिल्ह्यातील छोटे, मोठे तलाव भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला होता. यावर्षीही समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यामुळे सततच्या दुष्काळाच्या झळा सोसणारे शेतकरी आनंदी होते. पावसाळ्याच्या सुरवातीलाच मृग नक्षत्रात पावसाने दमदार सुरवात केली. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची ८४ टक्के पेरणी पूर्ण केली. सुरवातीच्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरलेले कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके उगवली; परंतु त्यानंतर पावसाने मोठी दडी मारली. मागील चाळीस दिवसांत जेमतेम आठ, दहा दिवस पाऊस पडला, पण तोही रिमझिम. यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. मागच्या दहा दिवसांपासून दररोज पडणारे रखरखत्या उन्हासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिके सुकून चालली आहेत. काही ठिकाणी अद्यापही पेरणी झाली नसून गंगामसला, मोठेवाडी, अंबेगाव, बोरगाव, पात्रुड, भाटवडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकात औत घालून पाळ्या घातल्या आहेत. बागायतदार शेतकरी उगवलेली पिके जगविण्यासाठी मोठी धडपड करताना दिसून येत आहेत.

मंडळनिहाय पाऊस
पावसाची तालुक्‍याची वार्षिक सरासरी ७४० मिलिमीटर असून आतापर्यंत केवळ २०२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जवळपास अर्धा पावसाळा संपत आला असताना तालुक्‍यात वार्षिक सरासरीच्या केवळ २७ टक्केच पाऊस झाला आहे. यात मंडळनिहाय पाऊस पुढीलप्रमाणे ः माजलगाव १८५, गंगामसला ११६, दिंद्रुड, नित्रुड २०४, तालखेड २३०, किट्टी आडगाव २०५ मिलिमीटर.

गंगामसलात रास्ता रोकोचा इशारा
महसूल प्रशासनाने पावसाअभावी नुकसान होत असलेल्या पिकाचे पंचनामे न केल्यास ११ ऑगस्ट रोजी गंगामसला येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा परसराम सोळंके, हरिभाऊ सोळंके यांच्यासह शंभर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

पावसाअभावी खरिपाची पिके धोक्‍यात आहेत. सुकून जाणारी पिके शेतकरी मोडीत असल्याने तहसील प्रशासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावेत.
-चंद्रकांत शेजूळ, जिल्हा परिषद सदस्य, बीड