'बीड-परळी रेल्वेच्या कामाला तीन जूनपासून होणार सुरुवात'

अतुल पाटील
गुरुवार, 1 जून 2017

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित परळी-बीड-नगर रेल्वेमार्गावरील परळी-बीड रेल्वेमार्गाचे काम तीन जूनला सुरू होणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांनी आज (गुरुवार) प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

औरंगाबाद - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित परळी-बीड-नगर रेल्वेमार्गावरील परळी-बीड रेल्वेमार्गाचे काम तीन जूनला सुरू होणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांनी आज (गुरुवार) प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

प्रसारमाध्यमांशी केलेल्या अनौपाचरिक चर्चेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "बीडसाठी रेल्वे महत्वाची आहे. (कै.) गौपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळी येथे तीन जूनला एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासठी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीडच्या रेल्वेसंदर्भात शब्द दिला आहे. त्यामुळे बीडच्या रेल्वेचे काम 2019 पर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. रेल्वेअभावी बीडमध्ये भौगोलिक मागासलेपण आहे. मात्र, रेल्वे आल्यानंतर हे मागासलेपण दूर होणार आहे.'

रेल्वेसंबंधित उद्योग बीड जिल्ह्यात सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री, रेल्वेमंत्र्यांकडे करणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. "बीडमध्ये आतापर्यंत 19 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तीन जूनपासून परळी-बीड रेल्वेमार्गाचेही काम सुरू करण्यात येणार असल्याने काम लवकर पूर्ण होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत', अशी आशा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. परळी-बीड-नगर रेल्वेमार्गापैकी नगर-बीड मार्गाचे काम यापूर्वीच सुरू झाले असून 19 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. आता काम वेगाने पुढे नेण्यासाठी तीन जूनपासून परळी-बीड मार्गाचेही काम सुरू करण्यात येणार आहे.