नव्या पर्वाची सुरुवात: समाजावरील पकड दाखवण्यात पंकजा मुंडेंना यश

दत्ता देशमुख
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

भगवान गडावरील मेळाव्याला जमणारी गर्दी ही गडामुळे असे विश्लेषण करायला विरोधकांना वाव होता. पण, ऐनवेळी मेळावा घेऊन त्यालाही मोठी गर्दी जमवून त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर तर दिलेच शिवाय स्वपक्षातील विरोधकांनाही समाज मागे असल्याचा संदेश देण्याची त्यांना या निमित्ताने संधी मिळाली.

बीड - महंतांनी भगवान गडावरील दसरा मेळावा घेण्याला दिलेला नकार आणि या मार्गावर त्यांच्या काही राजकीय विरोधकांनी अंथरलेले काटे असा दुहेरी पेच असतानाच मंत्री पंकजा मुंडे यांनी सिमोल्लंघनाचे आव्हान पेलले. समाजाचे सर्वश्रेष्ठ असलेल्या संत भगवान बाबांच्या कर्मभूमीत सभेसाठी नकार देण्यात आल्यानंतर त्यांच्या जन्मभूमीत मेळावा यशस्वी करुन त्यांनी नव्या पर्वाची सुरुवात केली. समाजाने मेळाव्याला दिलेला प्रतिसाद पाहता त्यांनी समाजावरील पकड पुन्हा दाखवून दिली आहे. 

संत भगवान बाबांनी त्यांची कर्मभूमी असलेल्या भगवान गडावर सुरु केलेल्या मेळाव्यात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी १९९३ पासून २०१३ पर्यंत भाषण केले. यामुळे उपेक्षित समाज व ऊसतोड मजूरला उर्जा मिळायची. समाज मुंडेंच्याच पाठीमागे आहे हेही मेळाव्यातून सिद्ध होई. समाजासाठी सोसलेल्या वेदना, घेतलेल्या कष्टामुळे संत भगवान बाबा समाजाचे सर्वश्रेष्ठ आहेत. तर, दिवंगत मुंडेंनी समाजाला वेगळ्या उंचीवर नेत समाजाला प्रतिष्ठाही मिळवून दिल्याने त्यांचेही समाजातील स्थान अढळ आहे. संत भगवान बाबा, भगवान गड, समाज आणि गोपीनाथ मुंडे असे समीकरणच तयार झाले.

मुंडेंच्या निधनानंतर या समीकरणातील दिवंगत मुंडेंची पोकळी भरुन काढण्याची आणि त्यांचा वारसा चालवण्याची जबाबदारी त्यांच्या कन्या पंकजा मुंडेंवर आली. पण, समीकरणात दोन वर्षे राहू दिल्यानंतर पुन्हा ही वाट काट्याची झाली. मागच्या वर्षी त्यांना गडाच्या पायथ्याला मेळावा घ्यावा लागला. यंदाही भगवान बाबांच्या कर्मभूमीवरील मेळाव्यात काटे अंथरले जात होते. महंतांचा मेळाव्याला नकार आणि त्यांच्या राजकीय विरोधकांकडून याला मिळणारे पाठबळ अशी अडथळ्यांची मालिका पाहता त्यांनी जन्मभूमीची वाट धरली.

गुरुवारी संध्याकाही संत भगवान बांबांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे मेळावा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकाच दिवसात मोठी गर्दी जमवण्यातही पंकजा मुंडे यांना यश आले. भगवान गडावरील मेळाव्याला जमणारी गर्दी ही गडामुळे असे विश्लेषण करायला विरोधकांना वाव होता. पण, ऐनवेळी मेळावा घेऊन त्यालाही मोठी गर्दी जमवून त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर तर दिलेच शिवाय स्वपक्षातील विरोधकांनाही समाज मागे असल्याचा संदेश देण्याची त्यांना या निमित्ताने संधी मिळाली. पुन्हा एकदा समाज मागे उभे करण्यात त्यांना यश आले. या निमित्ताने त्यांनी ऐनवेळी सिमोल्लंघनाचे आव्हान पार पाडले आणि नव्या पर्वालाही सुरुवात केली.

धोंडेंचा जवळिकतेचा प्रयत्न तर शिंदेंबद्दल समाजात तिटकाराच

दरम्यान, भिमराव धोंडे हे चौथ्यांदा आमदार आहेत. दिवंगत मुंडेंसोबत आमदार म्हणून केलेले काम आणि वयाने जेष्ठ असल्याने ते आतापर्यंत पंकजा मुंडेंना नेतृत्व मानत नसत. कामांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी घेताना पंकजा मुंडे कधीही सोबत दिसल्या नाहीत. गडकरीच धोंडेंचा ‘राजमार्ग’ असल्याने ते पंकजा मुंडेंना ‘बायपास’ करतात असा समाजात समज आहे. त्यातच अलिकडे सुरेश धसांची पंकजा मुंडेंसोबत जवळीक वाढली आहे. त्यामुळे भविष्यात पंकजा मुंडे आणि समाजाचीही गरज लक्षात आल्याने धोंडेंनी या मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडेंच्या जवळिकतेचा प्रयत्न केला.

मेळाव्या नियोजनात लक्ष तर घातलेच शिवाय भाषणात ‘भावी मुख्यमंत्री’ असा पंकजा मुंडेंचा उल्लेख केला. भगवान गडावर मेळावा होऊ नये यासाठी राम शिंदेही प्रयत्न करत असल्याचा आरोप मुंडे समर्थकांनी केला होता. मात्र, भविष्यातील राजकीय गणित पाहता निवडणुका जिंकण्यासाठी समाज पाठीशी असावा हे लक्षात आल्याने मंत्री शिंदे मेळाव्याला हजर राहिले. मात्र, उपस्थितांमधून मंत्री शिंदेंच्या विरोधातील घोषणा थांबत नव्हत्या. अगदी पंकजा मुंडे व प्रितम मुंडे भाषणात महादेव जानकर आणि राम शिंदे हे आमचे दोन भाऊ म्हणल्यानंतर उपस्थितांनी केवळ जानकर हेच भाऊ आहेत शिंदेंचे नाव घेऊ नका असा विरोधी सुर सुरुच ठेवला. दरम्यान, मागच्या वर्षी पंकजांच्या समर्थनार्थ जोरदार भाषण करणारे महादेव जानकर यांनी यंदाही भाषण करण्याचे जाहीर केले होते. पण, व्यासपीठावर दोन मंत्री असल्याने लोक मंत्री जानकरांच्या भाषणाला व्यत्यय आणतील हे पंकजांच्या लक्षात आले. आणि केवळ जानकरांना भाषण करु दिले तरीही वेगळा संदेश जाऊ शकतो हे लक्षात आल्याने महादेव जानकरांनाही भाषण करता आले नाही.