पाण्यावरून भाजपत "श्रेयवाद' नाट्य 

पाण्यावरून भाजपत "श्रेयवाद' नाट्य 

बीड - गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असून खरीप पिके पाण्याअभावी सुकू लागलेली आहेत. त्यामुळे माजलगाव धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी धरणातून गुरुवारी (ता.10) उजव्या कालव्यात 20 दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. माजलगाव धरणातून सोडण्यात येणारे पाणी आपल्याच पाठपुराव्याचे यश असल्याचा दावा पालकमंत्री पंकजा मुंडेंसह माजलगावचे आमदार आर. टी. देशमुख यांनी केला आहे. भाजपमधील या दोन्ही नेत्यांनी पाण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचा स्वतंत्र दावा करण्यात आल्याने नेमके प्रयत्न कोणी केले? असा सवाल खासगीत भाजपच्याच कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला आहे. त्यामुळे पाण्यावरून भाजपत चांगलेच "श्रेयवाद' नाट्य रंगले आहे. 

जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पिके धोक्‍यात आली असून शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. माजलगाव धरण क्षेत्रात माजलगाव व परळी तालुक्‍यातील गावे येत असल्याने धरणातील पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांमधून केली जात होती. माजलगाव येथील सिंदफणा नदीवर जायकवाडी टप्पा क्रमांक 2 आहे. या प्रकल्पाचा उजवा कालवा परळीच्या थर्मलकडे गेला आहे. धरण क्षेत्रात व कालव्याच्या क्षेत्रात माजलगाव व परळी तालुक्‍यातील गावे येतात. या कालव्यामुळे तालुक्‍यातील बरीचशी शेती सिंचनाखाली येते. पाऊस लांबल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांनी माना टाकल्या असून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. त्यामुळे माजलगाव प्रकल्पातून उजव्या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. 

दरम्यान, ही मागणी नागरिकांनी आपल्याकडे केल्याचा दावा पालकमंत्री पंकजा मुंडे व आमदार आर. टी. देशमुख या दोन्ही नेत्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केला आहे. या मागणीची दखल घेऊन आपण मंत्रालय स्तरावरून सूत्रे हलवून प्रशासनाला धरणातून उजव्या कालव्यात पाणी सोडण्यास भाग पाडल्यानेच हा प्रश्न सुटल्याचे सांगत याचे श्रेय आपले असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात असल्याचेही दोन्ही नेत्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. यामुळे धरणातून पाणी सोडण्याचे नेमके श्रेय कोणाचे? असा सवाल उपस्थित होत आहे. 

शेतकऱ्यांना दिलासा 
पाण्याच्या "श्रेयवाद' लढाईसाठी दोन्ही नेत्यांकडून होत असलेली रस्सीखेच सामान्यांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे. एकीकडे या श्रेयवादाचा कलगीतुरा रंगत राहणार असला तरी धरणामधून सिंचनासाठी उजव्या कालव्यात गुरुवारी सकाळी 9 वाजता पाणी सुटणार असल्याने कालवा परिसरातील शेतकऱ्यांना मात्र खरोखरच दिलासा मिळणार आहे. दरम्यान पाणी सोडण्यात येणार असल्याच्या वृत्ताला माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. शिंदे यांनी दुजोरा दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com