म्हणे, पाणचक्कीला हवे बोअरचे पाणी

आदित्य वाघमारे
सोमवार, 22 मे 2017

औरंगाबाद - कधी काळी हजारो नागरिकांची तहान भागवणाऱ्या, दळण दळून देणाऱ्या पाणचक्कीला आता म्हणे बोअरच्या पाण्याची गरज भासते आहे. त्यासाठी पाणचक्की परिसरात खड्डे पाडण्याचा आणि मनाजोगे बांधकाम करण्याचा वक्‍फ बोर्डाचा घाट राज्य पुरातत्त्व विभागाने हाणून पडला आहे. 

औरंगाबाद - कधी काळी हजारो नागरिकांची तहान भागवणाऱ्या, दळण दळून देणाऱ्या पाणचक्कीला आता म्हणे बोअरच्या पाण्याची गरज भासते आहे. त्यासाठी पाणचक्की परिसरात खड्डे पाडण्याचा आणि मनाजोगे बांधकाम करण्याचा वक्‍फ बोर्डाचा घाट राज्य पुरातत्त्व विभागाने हाणून पडला आहे. 

औरंगाबादसह देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पाणचक्कीच्या घशाला कोरड पडत असल्याचे सांगून वक्‍फ बोर्डाने पाणचक्की परिसरात बोअर घेण्याचा बेत आखला होता. वक्‍फ बोर्डाने घातलेला हा घाट राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी इमारतींना हादरे देणाऱ्या या कामाला ब्रेक लावला आहे. शनिवारी (ता. २०) पाणचक्की येथे झालेल्या बैठकीत राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वक्‍फच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले. पुरातत्त्व विभागाच्या संरक्षक स्मारकाच्या यादीत असलेल्या पाणचक्कीतून राज्य वक्‍फ बोर्डाचा कारभार चालतो. वक्‍फ बोर्डाने मनमानी कारभार करून हव्या तिथे भिंती आणि इमारतीला भोके पडून येथे अनेक बांधकामे केली आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले तर तळाशी सिमेंट गट्टू लावून या इमारतीला विद्रूप करण्यात आले. चुना लावण्यापलीकडे कुठलीही डागडुजी केली जात नाही. त्यामुळे येथील सौंदर्य लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पुन्हा चुना लावण्याचा आणि पाण्यासाठी बोअर घेण्यासाठी भूगर्भात खड्डे खोदण्याचे काम करू पाहणाऱ्या वक्‍फला राज्य पुरातत्त्व विभागाने खडसावले आहे. येथे कसलेही बांधकाम आणि डागडुजी राज्य पुरातत्त्व विभागाला विश्वासात घेतल्याशिवाय करू नये, असे सांगण्यात आले. कार्यालयात बसवण्यात आलेली वातानुकूलित यंत्रणा काढा आणि एसीचे आऊटडोअर युनिट जमिनीवर बसवण्याचा सल्ला यावेळी पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आला.

सफाई होना? लेटर देना पडता...
पाणचक्की पाहण्यासाठी पर्यटकांनी रविवारी (ता. २१) सकाळी तिकीट खिडकीवर असलेल्या कर्मचाऱ्याकडे सफाईबाबत विचारणा केली. पडलेला कचरा आणि घाण का काढण्यात आली नाही, याची विचारणा केली तेव्हा ‘सफाई होना, तो लेटर देना पडता,’ असे विचित्र उत्तर त्यांना मिळाले. येथे कधीही सफाई होत नाही आणि कचरा साठलेला असतो, असे येथे नियमित येणाऱ्या पर्यटकांनी सांगितले.  

पाणचक्कीचा झाला मीनाबाजार 
पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पाणचक्कीचा वक्‍फ बोर्डाने मीनाबाजार करून ठेवला आहे. पाणचक्कीच्या आतल्या भागात असलेल्या बगीचांचा विकास स्वतः जिल्हाधिकारी सेतुमाधवराव पगडी यांनी केला होता आणि येथील ग्रंथालयाची व्यवस्थाही लावली होती. पण कालांतराने पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाणचक्कीतील जागेचा वापर झाला आणि त्याचे रूपांतरण सध्या मीनाबाजारात झाले आहे. या बाजारामुळेच परिसरात आता कचरा, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुकानांच्या जोरावर बक्कळ पैसे कमाविणाऱ्या वक्‍फ बोर्डाने मात्र या जागेच्या सफाईकडे लक्ष दिलेले नाही.