जात पंचायतीने टाकले कुटुंबाला वाळीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - जातपंचायतीच्या न्याय निवाड्याचा भाग म्हणून सासऱ्यानेच जावयाच्या कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जातपंचायतीसमोर गंगापरीक्षा (शुद्धीकरण) दिली, मात्र त्यानंतरही समाजात घेतले जात नाही, असा आरोप चितोडिया लोहार समाजातील एका तरुणाने केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सासऱ्यासह अन्य एकाला पुण्याहून ताब्यात घेतले आहे. 

औरंगाबाद - जातपंचायतीच्या न्याय निवाड्याचा भाग म्हणून सासऱ्यानेच जावयाच्या कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जातपंचायतीसमोर गंगापरीक्षा (शुद्धीकरण) दिली, मात्र त्यानंतरही समाजात घेतले जात नाही, असा आरोप चितोडिया लोहार समाजातील एका तरुणाने केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सासऱ्यासह अन्य एकाला पुण्याहून ताब्यात घेतले आहे. 

राणासिंग चितोडिया (वय ३५) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते औरंगाबादेतील देवळाई परिसरात कुटुंबासह राहतात. रतनसिंग ठाकूर (रा. दत्तवाडी, पुणे) हे त्यांचे सासरे आहेत. ऑगस्ट २०१३ मध्ये रतनसिंग ठाकूर यांनी फोन करीत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप राणासिंगवर केला. त्यामुळेच तुमच्या कुटुंबाला जातीबाहेर काढले आहे, असे सांगत शिवीगाळ केली. ठार मारण्याची धमकीही दिल्याचे राणासिंग यांनी तक्रारीत नमूद केले आहे. चितोडिया यांनी मात्र सासऱ्याचे सर्व आरोप फेटाळून लावत आरोप सिद्ध झाल्यास कुठलीही शिक्षा भोगण्याची तयारी दर्शविली होती. २७ मार्च २०१५ रोजी हुबळी येथे जातपंचायतीसमोर चितोडियांची गंगापरीक्षा (शुद्धीकरण) करण्यात आली. त्यात चितोडियांच्या सासऱ्याने केलेले आरोप खोटे ठरले; मात्र त्यानंतरही अनेकदा विनंती करूनही जातीत सामावून घेतले नाही. जातीतून बहिष्कृत केल्याने घरातील सर्व सदस्य दडपणाखाली आहेत. जातीबाहेर टाकल्याने लहान भावास कुणी लग्नासाठी मुलगी देत नाही, असा आरोप तक्रारदार चितोडिया यांनी केला आहे. रतनसिंग ठाकूर, रवींद्र ठाकूर, देविसिंग चितोडिया, कृष्णासिंग चितोडिया, नवससिंग चितोडिया यांनी कट करून कुटुंबाला वाळीत टाकले, अशी तक्रार राणासिंग चितोडिया यांनी केल्याने चिकलठाणा पोलिस ठाण्यात पूर्वीच गुन्हा दाखल झालेला होता, असे पोलिस निरीक्षक काकडे यांनी सांगितले.

पुण्याहून घेतले ताब्यात
तक्रारदार चितोडियाला वर्ष २०१३ पासून जातीबाहेर टाकलेले आहे. त्यामुळे न्याय मिळावा, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चिकलठाणा पोलिसांनी संशयितांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. संशयित जडीबुटी औषध विक्रीचा व्यावसायिक असल्याने ते नेहमी फिरतीवर असतात; मात्र ते सध्या पुण्यातील हिंजेवाडी भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिस कर्मचारी एस. आर. राठोड, काशिनाथ लुटे, पांडुरंग चव्हाण यांनी कारवाई करीत रतनसिंग, देवीसिंग या दोघांना ताब्यात घेऊन औरंगाबादला आणले.

Web Title: caste panchayat protest on family

टॅग्स