कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जयश्री खोबे यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

उच्च पदे सर्वसामान्यांना न देता ती घरातील सभासदांकरिता मिळविण्याची तयारी ठेवली जात असेल तर महिला जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची आपली इच्छा नाही, असेही त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे

परभणी - महापौरपदासाठी संधी मिळाली नसल्याने नाराज झालेल्या कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जयश्री खोबे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाचा वापर करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

परभणी महापालिकेच्या महापौरपदासाठी शुक्रवारी (ता. 12) कॉंग्रेसकडून दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. माजी नगराध्यक्ष जयश्री खोबे यांना यासाठी संधी मिळाली नाही. त्यामुळे श्रीमती खोबे यांनी महिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामापत्रात त्यांनी परभणी जिल्ह्यातील कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व इतर नेते केवळ स्वार्थाकरिता आणि आपल्या जवळच्या नातेवाईक व काही विशेष लोकांसाठी कॉंग्रेस पक्षाचा वापर करीत आहेत, असे म्हटले आहे. सर्वत्र समानता असताना महिला कॉंग्रेसला पाच टक्केही समानता दिली जात नाही. 25 वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने काम करूनही महापौरपदासाठी अडथळा राहू नये म्हणून महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी छुपी युती करून आपणास पराभूत करण्याचा प्रयत्न केला गेला. उच्च पदे सर्वसामान्यांना न देता ती घरातील सभासदांकरिता मिळविण्याची तयारी ठेवली जात असेल तर महिला जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची आपली इच्छा नाही, असेही त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.

Web Title: Congress leader resigns