पहाडसिंगपुऱ्यातील रहिवाशांचा सहानुभूतिपूर्वक विचार करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - रेणुकानगरातील रहिवाशांचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, पावसाळ्यात या नागरिकांना बेघर करू नका, नागरिकांना त्रास होऊ नये, जमिनीचा ताबा मालकाला देण्यासाठी न्यायालयाकडून दोन महिन्यांचा अवधी मागून घ्यावा, अशी विनंती खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी (ता. 19) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

बिबी का मकबऱ्यापाठीमागील पहाडसिंगपुरा, रेणुकामातानगर, ताजमहल कॉलनी परिसरातील सर्व्हे नंबर 99/1 व 99/2 मधील 18 एकर 29 गुंठे जमिनीवर भूमाफियांनी प्लॉटिंग करून विकली. या ठिकाणी सुमारे अडीचशे कुटुंबांनी आपला संसार थाटला. या अतिक्रमणाविरोधात जमीनमालकाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. अखेर न्यायालयाच्या आदेशाने ही जमीन मूळ मालकाला परत देण्यासाठी सप्टेंबर 2015 मध्ये महसूल प्रशासनाने कारवाई केली होती. यानंतर रहिवाशांतर्फे न्यायालयाकडे मुदत मागितली होती. घरातील साहित्य काढून घेण्यास न्यायालयाने काही दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतरही रहिवाशांनी ताबा न सोडल्यास तहसील प्रशासनाने कारवाई करून सदर जागा मूळ मालकाच्या ताब्यात द्यावी, असे निर्देश न्यायालयाने आदेशात दिलेले आहेत, त्यामुळे आता तहसील प्रशासनाने कारवाई करण्यापूर्वी रहिवाशांना नोटिसा बजावून घरे रिकामी करण्यास बजावले आहे. 

या संदर्भात खासदार खैरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांची सोमवारी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, महापौर त्र्यंबक तुपे, आमदार इम्तियाज जलील, नगरसेवक सचिन खैरे, हिरा सलामपुरे, योगेश पवार, सागर पवार, पापालाल गलडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.