धोकादायक पुलांचे सेफ्टी ऑडिट गुलदस्त्यातच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - महाडमध्ये जुना पूल कोसळून शेकडो जणांचे जीव गेले, या घटनेची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्‍तांनी शहरातील तसेच मराठवाड्यातील जुन्या पुलाचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. या आदेशाला महिना उलटला असून अद्यापही या अधिकाऱ्यांचा सेफ्टी ऑडिटचा अहवाल गुलदस्त्यात आहे. विभागीय आयुक्‍तांचेच कुणी ऐकेना, अशी अवस्था झाल्याचे दिसत आहे. तर सिल्लोडच्या घटनेनंतर पुन्हा हा विषय ऐरणीवर आला आहे. 

महाड येथील जुना पूल ऑगस्टमध्ये कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत पुलावरून धावणाऱ्या बसगाड्यांसह अनेक वाहने नदीत कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेने राज्यासह देशाला हादरून टाकले होते. औरंगाबादसह मराठवाड्यातही निजामकालीन पूल आहेत. या पुलांची अवस्थाही आज चांगली नाही. अनेक ठिकाणी पुलांना तडे गेल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थिती मराठवाड्यातही महाडच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. औरंगाबादसह मराठवाड्यात जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक पुलांचे बांधकाम केलेले आहे. शिवाय महापालिका हद्दीतील जुन्या पुलांच्या दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची आहे.

महाडच्या घटनेनंतर विभागीय आयुक्‍त डॉ. उमाकांत दांगट यांनी सर्वच पुलांची पाहणी करून आज त्यांची अवस्था काय आहे, वाहतुकीसाठी हे पूल सुरक्षित आहेत का, दुरुस्तीसाठी काय करावे लागेल, त्यासाठी किती खर्च येईल आदी माहितीसह सेफ्टी ऑडिटचा अहवाल मागवला होता. 

जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिकेकडून विभागीय आयुक्‍तांच्या आदेशाला खो महाडच्या घटनेनंतर सोमवारी सिल्लोडजवळ कोसळला जुना पूल

ऐतिहासिक नगरीतील पुलांकडे दुर्लक्ष

पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील निजामकालीन पुलांची दुरवस्था झालेली आहे. त्यावरून अवजड वाहनांना ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली होती. अवजड वाहने रोखण्यासाठी लावलेले मोठमोठे लोखंडी रॉडही तोडून नेण्यात आल्यामुळे अशा वाहनांना पुन्हा एकदा वाहतुकीसाठी रस्ता मोकळा झाला आहे. विभागीय आयुक्‍तांच्या आदेशानंतरही महापालिकेने या पुलांवरील अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी कोणतीच पावले उचचली नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी (ता. पाच) दुपारी चारच्या सुमारास सिल्लोड शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील एक जुना पूल कोसळल्याने दोन दुचाकीवरील तीन-चार जण जखमी झाले आणि पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Web Title: Dangerous bridges relevant safety audit