बलात्कार, खून प्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

हिंगोली - वारंगा मसाई (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी दोघांना येथील जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली.

हिंगोली - वारंगा मसाई (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी दोघांना येथील जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली.

वारंगा मसाई येथे सात जानेवारी 2016 रोजी चार वर्षे चार महिने वयाची बालिका दुपारी घरासमोर खेळत होती. त्या वेळी भागवत परबती क्षीरसागर, राहुल ऊर्फ सतीश मसाजी क्षीरसागर तेथे आले. चॉकलेटच्या बहाण्याने ते बालिकेला सोबत घेऊन गेले. परंतु उशिरापर्यंत परतलेच नाहीत. शोधाशोध करूनही बालिका न सापडल्याने बालिकेचे वडील संभाजी क्षीरसागर यांनी कळमनुरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शोध घेतला असता, परबती क्षीरसागर याच्या घरात पोत्यात भरून ठेवलेला बालिकेचा मृतदेह आढळला. तोंडात कापसाचा बोळा, कपड्यावर रक्‍ताचे डाग, शरीरावर अनेक ठिकाणी रक्‍तस्रावाच्या खुणा होत्या. कळमनुरी पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

न्यायालयाने आज आरोपी भागवत क्षीरसागर व राहुल क्षीरसागर यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. यासोबतच विविध कलमांन्वये चार हजार रुपये दंडही ठोठावला.