विकास करा; अन्यथा तेलंगणमध्ये जाऊ द्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

धर्माबाद, (जि. नांदेड) - आमच्या तालुक्‍याचा विकास करा; अन्यथा तालुक्‍यातील ग्रामपंचायतींना तेलंगणमध्ये जाण्यास परवानगी द्या, अशी मागणी तालुक्‍यातील सरपंच संघटनेच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी तहसीलदार ज्योती चौहान यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. संघटनेच्या या मागणीमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

धर्माबाद, (जि. नांदेड) - आमच्या तालुक्‍याचा विकास करा; अन्यथा तालुक्‍यातील ग्रामपंचायतींना तेलंगणमध्ये जाण्यास परवानगी द्या, अशी मागणी तालुक्‍यातील सरपंच संघटनेच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी तहसीलदार ज्योती चौहान यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. संघटनेच्या या मागणीमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या सीमेवरील धर्माबाद तालुक्‍यात गेल्या साठ वर्षांत विकास पोचलेला नाही. तालुक्‍यात रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या तालुक्‍याचा समावेश शेजारच्या तेलगंण राज्यात करावा, अशी मागणी या संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव कदम यांनी तेलंगणचे आमदार बाजरेड्डी गोवर्धन यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी (ता.25) सकाळी सरपंच संघटनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत या मागणीवर सखोल चर्चा झाली असून, या मागणीवर बहुसंख्य सरपंच ठाम आहेत. या वेळी राज्य शासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या कार्यप्रणालीवरही नाराजी व्यक्त करण्यात आली; तसेच एकमताने तसा ठरावही मंजूर करण्यात आला.

अशा आहेत मागण्या -
सर्व गावात रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, तालुक्‍यातील मुख्य रस्ते दर्जेदार व्हावेत, बाभळी बंधाऱ्याचे गेट कायमस्वरूपी बंद करावे, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, शहरात रेल्वे उड्डाण पूल उभारावा, मुदखेड ते सिकंदराबाद दुहेरीकरण व लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा.

खासदार कवितांना शिष्टमंडळ भेटणार -
या मागणीसाठी सरपंचांचे शिष्टमंडळ शनिवारी (ता.26) निजामाबादच्या खासदार कविता कलवकुंटला व आमदार बाज रेड्डी गोवर्धन यांची भेट घेऊन मागणीसंदर्भात सखोल चर्चा करणार असल्याचे बाबूराव कदम यांनी सांगितले. या भेटीत ते तेलगंणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तारीख व वेळ घेणार आहेत. श्रीमती कविता या तेलगंणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या आहे.

Web Title: development sarpanch organisation telangan devendra fadnavis