जिल्हा व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण अधिकारी, लघुलेखक जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

औरंगाबाद - जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व लघुलेखकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. 14) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रंगेहाथ पकडले. टॅली कोर्सला मान्यता देण्यासाठी त्यांनी दहा हजारांची लाच घेतली.

औरंगाबाद - जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व लघुलेखकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. 14) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रंगेहाथ पकडले. टॅली कोर्सला मान्यता देण्यासाठी त्यांनी दहा हजारांची लाच घेतली.

शशिकांत दामोदर गुंटूरकर (वय-55) असे प्रशिक्षण अधिकाऱ्याचे तर सुरेश चंद्रय्या नरगुल्ला (वय-53) असे लघुलेखकाचे नाव आहे. तक्रारदार हे ग्रोथ एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्यांची ग्रोथ व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर नावाची संस्था आहे. या संस्थेत टॅलीचा कोर्स सुरू करण्यासाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयात फाइल सादर केली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने त्यांना कोर्ससाठी तात्पुरती मान्यता दिली होती. त्यानंतर 19 डिसेंबर 2016 ला त्यांनी पुन्हा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, औरंगाबाद येथे प्रस्ताव सादर केला. त्यांच्या प्रस्तावास मंजुरी न मिळाल्याने त्यांनी सात मार्च 2017 ला प्रशिक्षण अधिकारी शशिकांत गुंटूरकर याची भेट घेतली. प्रस्तावाबाबत त्यांनी विचारणा केली. त्यावेळी प्रस्ताव मुंबईस्थित कार्यालयात पाठवण्यासाठी खर्च करावा लागेल.

लाचेपोटी पंधरा हजार रुपये गुंटूरकर याने मागितले. यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा मार्चला लाच मागितल्याची पडताळणी केली, तेव्हा मंगळवारी (ता. 14) पैसे कार्यालयात देण्याचे त्याने तक्रारदाराला सांगितले. पथकाने सापळा रचला. तक्रारदार येताच त्यांना कार्यालयातील लघुलेखक सुरेश नरगुल्ला याने पैशांची मागणी केली. तक्रारदार यांनी पैसे देताच दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक विवेक सराफ, निरीक्षक अनिता वराडे, अश्‍वलिंग होनराव, मिलिंद इप्पर, संदीप आव्हाळे, सखाराम मोरे, दिगंबर पाठक, चालक राजपूत यांनी केली.

Web Title: district business education, training officer & clark bribe