गर्भवतींची जिल्हा रुग्णालयात हेळसांड

गर्भवतींची जिल्हा रुग्णालयात हेळसांड

बीड - जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांची हेळसांड सुरू आहे. खाटांची संख्या अपुरी पडत असल्योन जागेअभावी प्रसूत महिलांना तर चिमुकल्यांसह जमिनीवर उपचार घ्यावे लागत आहेत. 50 खाटांची क्षमता असलेल्या प्रसूती विभागात रोज दीडशेवर रुग्ण दाखल होत आहेत. 320 खाटांची क्षमता असलेल्या जिल्हा रुग्णालयाला अडीच वर्षांपूर्वी वाढीव 200 खाटांना मंजुरी मिळाली. मात्र, जागेअभावी हे काम रखडले आहे. याबाबत प्रशासकीय, राजकीय पातळीवरून होणारी अनास्थाही संतापजनक म्हणावी लागेल.

जिल्हा रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता वाढीव खाटांचे काम तातडीने होणे गरजेचे आहे. या मागणीसाठी आजवर अनेक संघटनांनी आंदोलने केली. आंदोलनांची दखल घेऊन आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढाकारामुळे रुग्णालयासाठी 200 वाढीव खाटांना मंजुरी मिळाली. वाढीव खाटांसाठी नवीन बांधकामासाठी रुग्णालय प्रशासनाने शेजारील गृह विभागाच्या मालकीच्या जागेची मागणी केली. सध्याच्या रुग्णालयात रक्तपेढी, प्रयोगशाळा, एक्‍स-रे आदी सर्व बाबी असल्याने ही जागा सोयीची आहे. मात्र, गृहविभाग मागणी केलेली जागा द्यायला तयार नाही. सध्या जिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या 320 असली तरी आंतररुग्ण विभागातील रुग्णांची संख्या सहाशेच्या घरात आहे. रविवारी सर्व विभागांतील आंतररुग्णांचा आकडा 598 वर गेला होता. वाढत्या रुग्णांमुळे निम्म्या रुग्णांना जमिनीवरच उपचार घ्यावे लागतात.

तिप्पट रुग्णसंख्येमुळे हाल
प्रसूती विभागाची क्षमता 50 खाटांची असली तरी नियमित महिला रुग्ण, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांची रोजची संख्या तिप्पट (150) असते. प्रसूतिगृहातील आवश्‍यक सुविधांचीही वाणवा आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक गर्भवतींनाही वेटिंग करावी लागते. त्यानंतरही खाट मिळण्याची हमी नाही. त्यामुळे चिमुकल्यासह जमिनीवर उपचार घ्यावे लागतात.

राजकीय पुढाकाराची गरज
आरोग्य विभाग आणि रुग्णांच्या दृष्टीने रुग्णालयाच्या वाढीव खाटांच्या बांधकामासाठी जिल्हा रुग्णालयाच्या बाजूची जागा सोयीची आहे; पण गृह विभागाच्या मालकीची जागा असल्याने त्यांच्याकडून ही जागा सहज मिळणे अशक्‍य आहे. राजकीय पातळीवरून हस्तक्षेप करून गृह विभागाला या बदल्यात शासनाची दुसरी जागा देऊनही जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले तरच गर्भवती आणि इतर रुग्णांची हेळसांड थांबणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com