डॉक्‍टर, वकिलांसह व्यापारी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर 

डॉक्‍टर, वकिलांसह व्यापारी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर 

बीड - जिल्ह्यातील वैद्यकीय, विधी आणि इतर क्षेत्रांतील व्यावसायिकांवर आता प्राप्तिकर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. नोंदणीकृत असतानाही प्राप्तिकर न भरणाऱ्या व नोंदणीच न केलेल्या अनेक व्यावसायिकांना प्राप्तिकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. पहिल्या टप्प्यात सरसकट डॉक्‍टर व काही वकील मंडळींना या नोटिसा बजावण्यात आल्या असून दुसऱ्या टप्प्यात इतर व्यावसायिक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असल्याचे समजते. मागील काही वर्षांत सातत्याने प्राप्तिकराचा महसूल घटत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

बीड जिल्ह्यात प्राप्तिकर अधिकाऱ्याचे पद अनेक दिवसांपासून रिक्त होते. यामुळे प्राप्तिकराच्या वसुलीवरही याचा परिणाम होत होता. नोकरी अथवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला प्राप्तिकर भरावा लागतो. वार्षिक अडीच ते तीन हजार इतका हा प्राप्तिकर आहे. मात्र काही अपवाद वगळता अनेक व्यसवसायिक मुळात प्राप्तिकराची नोंदणीच करीत नाहीत आणि केली तरी प्राप्तिकर भरत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील प्राप्तिकराची थकबाकी काही कोटींमध्ये असल्याची माहिती आहे. आतापर्यंत या विभागाला स्वतंत्र अधिकारी नव्हता, त्यामुळे प्राप्तिकराच्या वसुलीकडे फारसे लक्ष नसायचे. या वेळी मात्र या विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला असून प्राप्तिकराचे जिल्ह्याचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण न झाल्याने या विभागाने अगोदर वैद्यकीय व्यावसायिकांना लक्ष केले आहे. बीडसह प्रमुख शहरातील अनेक वैद्यकीय व्यावसायिकांना आणि काही वकील मंडळींना प्राप्तिकर विभागाने नोटीस बजावल्या असून 8 मार्चपर्यंत उत्तर मागविले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यात इतर व्यावसायिक या विभागाच्या रडारवर आहेत. 

"जस्ट डायल'ची घेतली मदत 
एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांची माहिती प्राप्तिकर विभागाकडे कशी आली, याचा किस्साही रंजक आहे. सध्या आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी प्रत्येकजण विविध माध्यमांचा वापर करतो. "जस्ट डायल' हा त्यापैकीच एक मार्ग. प्राप्तिकर विभागानेही "जस्ट डायल'ची सर्व माहिती वापरत अनेकांना नोटीस दिल्याची माहिती समोर आली आहे. 

ऑनलाईन उघडता येते खाते 
पूर्वी प्राप्तिकराचे खाते उघडण्यासाठी संबंधिताला कार्यालयात खेटे मारावे लागायचे. आता मात्र प्राप्तिकर विभागाकडे नोंदणी करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. कोणताही व्यावसायिक ऑनलाईन अर्ज भरून प्राप्तिकरासाठी नोंदणी क्रमांक मिळवू शकतो, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com