क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची गरज- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

शरद पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिष्यवृत्तीसाठी ५० लाख रुपये
आज या विद्यापीठामध्ये पाच व्यक्तींच्या नावाने शिष्यवृत्ती देण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी ५० लाख रुपयांचा धनादेश पाठविला जाईल. व्याजातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी, असे अपेक्षित आहे.

नांदेड : ‘शेतीचे झालेले तुकडे, निसर्गावरील अवलंबित्व, वाढती लोकसंख्या अशी बरीच कारणे केवळ शेतीवर गुजराण करणाऱ्यांसाठी बाधक ठरत आहे. त्यासाठी शेतीवरचा भार कमी व्हायला हवा. तो कमी करण्यासाठी कृषिप्रधान वर्गाला शिक्षण देण्याची, त्यातून नवीन संसाधन-संपत्ती निर्मितीचे मार्ग उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आज क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची खरी गरज आहे’, असे आग्रही प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १९ वा दीक्षांत समारंभ रविवारी (ता. २६) झाला. शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल त्यांना विद्यापीठाने ‘डॉक्टर आॅफ लेटर्स’ (डी. लीट) ही मानद पदवी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते देण्यात आली. त्या वेळी पवार बाेलत हाेते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री अर्जुन खोतकर, कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव भगवंतराव पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे उपस्थित होते.

पवार म्हणाले, की ग्रामीण भागात ज्या शेतकऱ्यांच्या घरात शिक्षण वाढले, त्या घरातले काहीजण अन्य व्यवसायात गेले. अशा कुटुंबात सुबत्ता आली. त्यामुळे इथल्या तरुणांनी शिक्षणाविषयी आग्रही राहायला हवे. शिक्षणच त्यांना तारू शकणार आहे. देशातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ही पंचविशीच्या आतली आहे. भारतीयांचे सरासरी वय १९ आहे. ही लोकसंख्या आपली ताकद आहे, हे ओळखून शिक्षणाच्या चांगल्या संधी या वर्गाला कशा उपलब्ध होतील, यावर तो ‘सामर्थ्य बनेल की ओझे?’ हे अवलंबून असणार आहे.

स्वामी रामानंदांचा आदर्श घ्यावा
माझ्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने डी. लीट ही मानद पदवी दिली, याचा मला अत्यानंद होत आहे. कारण माझ्या ५० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचा आशीर्वाद माझ्या पाठिशी होता. शिक्षणातून विद्यार्थ्यांना कसे घडवावे, त्यांना राष्ट्र हितासाठी प्रेरित करून इतिहास कसा घडवावा, याचा आदर्श घ्यावयाचा असेल तो स्वामी रामानंद तीर्थ यांच्याकडून घ्यावा. मुलांना केवळ कारकून करणारा अभ्यासक्रम शिकविण्यात त्यांना रस नव्हता. राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय कर्तव्य या भावना विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवून, सशक्त चळवळ उभारून स्वराज्य प्राप्तीचे ध्येय त्यांनी समोर ठेवलं.

स्वामीजी प्रेरणेचा अखंड स्त्रोत
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचे या विद्यापीठामध्ये सततम स्मरण होत राहील, याचा मला विश्वास आहे. विद्यार्थी, अध्यापकांसाठी स्वामीजी हे प्रेरणेचा अखंड स्त्रोत आहेत. समाधानाची बाब अशी, की कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या रूपाने एक दूरदृष्टी असणारे शिक्षणतज्ज्ञ, नेतृत्व या विद्यापीठाला लाभलेले आहे. त्यांनी ‘एक शिक्षक एक कौशल्य’ नावाचा कौशल्याधारित शिक्षण देणारा व विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण बनविणारा उपक्रम सुरू केला. शिवाय ‘स्वास’ ही विद्यार्थ्यांना सहाय्य करणारी अभिनव योजनाही सुरू केली आहे. याबाबी विद्यापीठाच्या उभारणीत मोलाची मदत करतील, यात तिळमात्र शंका नसल्याचे पवार यांनी सांगितले.

शरद पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिष्यवृत्तीसाठी ५० लाख रुपये
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना पाठबळ मिळावे म्हणून माझ्या कुटुंबीयांनी ‘शरद पवार चॅरिटेबल ट्रस्ट’ हे न्यास सुरू केले आहे. शिक्षणासाठी प्रोत्साहन करण्याचे काम हे न्यास करीत असून, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहाय्य कसे करता येईल याचा विचार प्रामुख्याने केला जातो. आज या विद्यापीठामध्ये पाच व्यक्तींच्या नावाने शिष्यवृत्ती देण्याची माझी इच्छा आहे.

त्यासाठी ५० लाख रुपयांचा धनादेश पाठविला जाईल. व्याजातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी, असे अपेक्षित आहे. १० पैकी सहा विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनी हे मराठवाड्यातील ग्रामीण भागातील असाव्यात. पहिली शिष्यवृत्ती महात्मा जोतिबा फुले, दुसरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तिसरी यशवंतराव चव्हाण, चौथी याच परिसरात सहकारी चळवळीतील नेते पद्मश्री श्यामराव कदम आणि पाचवी मुलींसाठीची शिष्यवृत्ती माझ्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या नावाने पुढील वर्षापासून देण्यात यावी, अशी सूचनाही पवार यांनी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांना केली.

Web Title: educational need to develop capacities, says sharad pawar