औरंगाबादेत धार्मिक स्थळांची पाडापाडी सुरू 

माधव इतबारे 
शुक्रवार, 28 जुलै 2017

औरंगाबाद शहरात असलेल्या 1101 धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने दिले होते.

औरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनाधिकृत धार्मिक स्थळांच्या पाडापाडीला शुक्रवारी (ता.28) सुरूवात करण्यात आली. प्रचंड पोलिस बंदोबस्तात पहिला हातोडा नारेगाव येथील मशिदीवर मारण्यात आला. महापालिका, पोलिस व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ही कारवाई करण्यात येत आहे. 

औरंगाबाद शहरात असलेल्या 1101 धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी, पोलिस व महापालिका प्रशासनाच्या बैठकांचे सत्र सुरू होते. महापालिकेने चार पथक नियुक्त करून कारवाईसाठी सज्ज ठेवले होते. शुक्रवारी सकाळी दहा वाजता शहराच्या विविध भागात हे चार पथके प्रचंड पोलिस बंदोबस्तात रवाना करण्यात आली. पहिली कारवाई सकाळी अकरा वाजता नारेगाव भागात असलेल्या मशिदीवर सुरू करण्यात आली तर इतर पथक पैठणरोड, हर्सूल व अदालत रोडवर कारवाईसाठी रवाना झाले होते. ही कारवाई अत्यंत गुप्तता बाळगून करण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा कुठेही विरोध झाला नाही.