समृद्धी मार्गासाठी शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

औरंगाबाद - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले असून, वाटाघाटीने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या जाणार आहत. त्याकरिता शेतकऱ्यांकडून हरकती व सूचना मागविण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

औरंगाबाद - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले असून, वाटाघाटीने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या जाणार आहत. त्याकरिता शेतकऱ्यांकडून हरकती व सूचना मागविण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे.

जिल्ह्यातील 112.31 किलोमीटरपैकी 110 किलोमीटर जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले असून जमिनीची भूमिअभिलेख कार्यालयामार्फत नोंद घेऊन यादी तयार करण्याचे काम केले जात आहे. जमीन मोजणीला अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला होता; मात्र विरोध डावलून मोजणी करण्यात आली. आता शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करून जमीन संपादनाची प्रक्रिया केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या नावाने जमीन खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांकडून हरकती मागविण्यासाठी नोटिसा बजावण्यात येणार आहेत. 15 मे रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून जाहीर नोटीस काढण्यात आली असून गावनिहाय ग्रामपंचायत कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी, तहसील, रस्ते विकास महामंडळ कार्यालयात नोटीस लावण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हरकती मांडण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हरकतीमध्ये शेत जमिनीमधील अंतर्गत वाद, न्यायालयीन प्रकरणांची माहिती, वाटणीपत्रे याबद्दलची माहिती सादर करावी लागणार आहे. या प्रकल्पासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या क्षेत्र आराखड्याची प्रत उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत जमीन धारकांना, संबंधित नागरिकांना निरीक्षणासाठी ठेवण्यात आली आहे.

पंधरा दिवसांची मुदत
शेतकऱ्यांनी 15 दिवसांत लेखी स्वरूपात हरकती व सूचना सादर कराव्यात. ज्या शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या नाहीत, त्यांची कोणतीही हरकत नसल्याचे ग्राह्य धरून वाटाघाटीची चर्चा केली जाणार असल्याचे नोटिसीमध्ये नमूद केले आहे.