तीन दिवसांत पाच मुलांचे बळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - पोहता येत नसतानाही उत्साहापोटी तलावात पोहायला जाणे असो की वाहतूक नियमांचा भंग करून वाहने चालवणे असो, या कृतींनी मुलांचा जीव धोक्‍यात येत असून, हलगर्जी व दुर्लक्ष अंगलट येत असल्याची पालकांत चर्चा आहे 

औरंगाबाद - पोहता येत नसतानाही उत्साहापोटी तलावात पोहायला जाणे असो की वाहतूक नियमांचा भंग करून वाहने चालवणे असो, या कृतींनी मुलांचा जीव धोक्‍यात येत असून, हलगर्जी व दुर्लक्ष अंगलट येत असल्याची पालकांत चर्चा आहे 

अठरा वर्षांआतील मुलांचे वय असमंजसपणा आणि हट्टीपणाचे असते. मोबाईल घेऊन दिला नाही, अभ्यासाचा तगादा लावला अशा या-ना- त्या कारणाने मुले घरातून पळ काढतात, प्रसंगी आत्महत्येचा मार्ग पत्करतात... अशी उदाहरणे समाजात दिसतात. अशा स्थितीत मुलांत समंजसपणा आणि ते करीत असलेल्या कृत्याचे अनिष्ट परिणाम, धोके त्यांना वेळीच समजावून सांगण्याची कुटुंबाची जबाबदारी आहे. पोहण्यासाठी मज्जाव करूनही बुधवारी चिन्मय व विवेक पोहण्यासाठी गेले आणि सातारा तांड्यातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी सुधाकरनगर येथील तळ्यात गिरीश, धनंजय या मुलांचा बुडून मंगळवारी मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ गुरुवारी दुचाकी चालवणाऱ्या मुकुंदाला जीव गमवावा लागला. नियमांचे पालन न करणे, बेफिकिरी जिवावर बेतू शकते या बाबी अपघातांनी दाखवून दिल्या. तीनच दिवसांत पाच उमद्या मुलांचे बळी गेल,ह्हिी बाब मोठी गंभीर असून, अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून पालकांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. 

मुलांच्या हाती गाडी देऊ नका 
वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली नसताना मुलांच्या हाती वाहन देणे, हे मोटार वाहन नियमांविरुद्ध आहे. सेक्‍शन 3 व 4 नुसार, वाहन परवाना आवश्‍यक आहे. सेक्‍शन 5 नुसार अठरा वर्षे पूर्ण असावीत. मात्र बरेचसे पालक मुलांच्या हाती सर्रास गाडी देऊन त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलतात. एक चूक त्यांच्या जिवावर बेतू शकते. मुलांच्या हाती गाडी दिल्यास वाहतूक पोलिस त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करू शकतात अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.