माजी खासदार प्रदीप जैस्वाल  यांना सशर्त जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

औरंगाबाद - माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर गुरुवारी (ता. २४) जामीन मंजूर केला. 

औरंगाबाद - माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर गुरुवारी (ता. २४) जामीन मंजूर केला. 

जैस्वाल यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषा वापरत, तेथील खुर्च्या भिरकावल्या व टेबलची काच फोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यापूर्वी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी त्यांच्या जामिनाला विरोध केला. जैस्वाल हे राजकीय दबाव टाकू शकतात. त्यांच्यासह दोन नगरसेवकांचा दंगल घडविण्यात कितपत सहभाग आहे, याची चौकशी करायची आहे. त्यामुळे सरकारी पक्षाने जैस्वाल यांना जामीन देण्यास विरोध केला; तर बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. जैस्वाल हे गेल्या काही वर्षांपासून अतिउच्च रक्तदाबाने आजारी आहेत. त्यांना यकृताचा आजार असल्यामुळे ते आजारी व्यक्तीच्या व्याख्येत बसू शकतात. त्यांच्यावर यापूर्वी कोणताच गुन्हा नोंद नाही. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न देता न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांनी तपासात सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्याची विनंती करण्यात आली. 

सुनावणीअंती न्यायालयाने जैस्वाल यांनी तपास अधिकाऱ्यांनी बोलाविल्यावर पोलिस ठाण्यात हजर व्हावे, तपासात सहकार्य करावे, साक्षीदारांवर दबाव टाकू नये, न्यायालयाच्या परवानगीशिवाय शहर सोडू नये, अशा अटी घालत त्यांना जामीन मंजूर केला. जैस्वाल यांच्यातर्फे ॲड. के. जी. भोसले व ॲड. अभयसिंह भोसले यांनी काम पाहिले.

Web Title: Former MP Pradeep Jaiswal gets conditional bail